नांदेड जिल्हा बॅकेला गतवैभव मिळवून देणारचं; पालकमंत्री अशोक चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास

महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा मला विश्वास आहे, असं चव्हाण म्हणाले.

    नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.दरम्यांन या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.

    समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही चव्हाण यांनी आभार मानले आहेत. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, असा विश्वास चव्हाणांनी व्यक्त केला.

    दरम्यांन पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की, जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा मला विश्वास आहे, असं चव्हाण म्हणाले.

    तसेचं सर्व उमेदवार व या विजयाच्या शिलेदारांना त्यांनी आवाहन केले की, सध्याची कोरोनाची परिस्थिती व ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे झालेले निधन लक्षात घेता कोणताही जल्लोश करू नये. आणि पुन्हा सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.