‘लक्षात असू द्या’ कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक; आमदारांकडूनच विमा कंपन्यांची पोलखोल

    नांदेड : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता पीकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विमा कंपन्यांनीही आता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा करायला सुरूवात केली आहे.

    दरम्यान त्यातच विमा कंपन्यांच्या कामाची स्वत: आमदारांनीच पोलखोल केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील हे विमा कंपन्याचा कारभार कसा चालतो हे सांगताना म्हणाले, ‘विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामा करायला येत आहेत, पण त्यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची अजिबात मानसिकता नाही, तसेच शेतकऱ्यांना नुकसानीची टक्केवारीही त्यांच्याकडून सांगितली जात नाही’, अशा प्रकारचं काम विमा कंपन्या करत असल्याचं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना पुरेशी आणि व्यवस्थित माहिती देत नाहीत. शिवाय कोऱ्या कागदावर सह्या घेऊन मनमानी कारभार विमा कंपन्या चालवत आहेत, असा थेट आरोपही माधवराव पाटील यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी कोऱ्या कागदावर सह्या करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

    शेतात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मात्र विमा कंपन्या दाखवत असलेलं नुकसान हे कमी असल्याने नुकसानीची व्यवस्थित टक्केवारीसह माहिती झाल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या करू नका, असं आवाहन आमदार माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.