वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट, यापुढे त्यांच्यासोबत युती न करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्धार

वंचित बहुजन आघाडी यापुढे कधीच एमआयएम सोबत युती (split in mim and wanchit bahujan aghadi) करणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

नांदेड  : काँग्रेसला कधीच न सोडण्याचा वसा घेतलेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तीला मी राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी केलेला प्रयत्न त्यांनी खोटा ठरविला. मुस्लिम भितो म्हणूनच अनेक मुद्दे आजही मागे पडतात.  वंचित बहुजन आघाडी यापुढे कधीच एमआयएम सोबत युती (split in mim and wanchit bahujan aghadi) करणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

ते म्हणाले की, हिंदू मतदारांनी मतदान करुन इम्तियाज जलीलला खासदार केले. त्याची अवस्था पहा,तो लोकांच्या शिव्या खात आहे,आता तरी मतदारांनी पदवीधर मतदारसंघात आपला फायदा पाहून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे आणि शिक्षण क्षेत्रात सुरु असलेली फसवेगिरी थांबवावी, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधनच्या दौर्‍यावर असताना ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, तेव्हा त्यांनी एमआयएम या शिवाय देशात मुसलमानांचा दुसरा चेहराच नव्हता. म्हणून मी त्यांच्यासोबत युती करुन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले होते. पण आपसातील ओढाकाढीमुळे आज झालेल्या परिस्थितीत मी एमआयएमसोबत पुढे कधीच युती करणार नाही, असे सांगितले. सन २००४पासून मी ईव्हीएमबाबत विरोधात बोलत आहे,पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना ते ईव्हीएमचा वापर इतरांना हरविण्यासाठी करत होते आणि भारतीय जनता पार्टी आली तेंव्हापासून त्यांनी ईव्हीएमचा उपयोग जिंकण्यासाठी करत आहेत.

निवडणूक आयोग सुध्दा याबाबीकडे मागील सोळा वर्षापासून कानाडोळाच करत आलेला आहे. ईव्हीएम मशिनमधील तांत्रिकता शोधणे याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, तंत्रज्ञान विषयात मुस्लिम विद्यार्थी जास्त हुशार असतात त्यांनीच या ईव्हीएमचा घोळ शोधला पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

शिक्षण क्षेत्रातील होणारी फसवणूक थांबावी किंबहुना ज्या उद्देशाने पदवीधर मतदारसंघ तयार झाला जेणेकरुन पदवीधरांच्या समस्या शासनापर्यंत मांडल्या जाव्यात, असे जिंकायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जनतेने मतदान करावे. नांदेड जिल्ह्यात ४९ हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यात जवळपास २२ हजार मतदार आरक्षित प्रवर्गाचे आहेत. या सर्वांनी पहिल्या पसंतीचे मत देताना आपल्या समस्यांचा विचार करावा, धर्माचा विचार करु नये आणि असे घडले तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नक्कीच जिंकणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.