देगलूर पोटनिवडणुकीसाठी रणनीती, काँग्रेसची महत्त्वाची बैठक, ‘हे’ मोठे नेते राहणार उपस्थित

काँग्रेसच्या वतीने उद्या नांदेडमध्ये चार जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्य प्रभारींसह अर्धाडझन मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली असून त्याचाच भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

    नांदेड : काँग्रेसच्या वतीने उद्या नांदेडमध्ये चार जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्य प्रभारींसह अर्धाडझन मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली असून त्याचाच भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

    दरम्यान या मेळाव्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. देगलूर विधानसभेच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागला असून निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या बैठकीला नांदेड, हिंगोली परभणी आणि लातूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्याना आमंत्रित करण्यात आलं आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजता मालेगाव रस्त्यावरील भक्ती लॉन्स  येथे नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहे.

    काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील भव्य डिजीटल बॅनर सर्वांचे आकर्षण ठरत आहे. भक्ती लॉन्स येथील चार जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत ठेवण्यात आलेल्या आढावा बैठकीस केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

    स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या सत्कार

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. कुसुम सभागृहात 24 रोजी सकाळी 10 वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाएँ संविधान’ या अंतर्गत जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.