भाजपाने दगा दिला नाही; चंद्रकांत पाटील यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

    नांदेड : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही दगा दिला असता तर शिवसेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या, असा दावा पाटील यांनी केला आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भात आयोजित कार्यक्रमाला पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

    नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साबणे यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. साबणे यांच्याबरोबरच राऊत यांनी भाजपवरही टीकेची तोफ डागली.

    भाजपाने अनेक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केले आहे. भाजपाकडे स्वत:चे असे काहीच नाही. आता एक निवडणूक लढण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा माणूस घेतला, तोही रडका. शिवसैनिक हा रडत नाही. परिस्थितीविरुद्ध लढतो. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही, असे राऊत म्हणाले. दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन सूज दाखवायचे जे धोरण भाजपाने सुरू केले, ते फार काळ चालणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

    विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिले. महाविकास आघाडीला निवडले नाही. युती केली नसती तर भाजपाचे 144 आमदार निवडून आले असते. युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे 20 आमदार पडले. आम्ही धोका दिला असता तर तुमच्या फक्त पाचच जागा आल्या असत्या. मागच्या निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपाने घेतली होती. 124 जागा लढवून सुद्धा आमचे 105 आमदार आले. अपक्ष आमदार सुद्धा आमच्या संपर्कात होते. पण उद्धव ठाकरे यांचे सरकार येणार असल्याचे समजल्याने ते आमदार तिकडे गेले.

    - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा