भीषण बस अपघातात सहा जणांचा मृत्यू

नंदुरबारमध्ये एका ट्रॅव्हल बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आलीय.

नंदूरबार : ही घटना आहे आज (बुधवार) सकाळची. प्रवाशांनी भरलेली एक खाजगी बस खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. ही बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी

धाव घेतली. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास ही खासगी बस दरीत कोसळली. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात हा अपघात झाला. ही बस जळगावकडून सूरतकडे चालली होती. नंदूरबारजवळील कोंडाबाई घाटातल्या दर्ग्याजवळ पुलावरून ती थेट ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोचवण्यात आलं.

अपघात भीषण असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. नेमका अपघात कसा झाला याचाही पोलीस शोध घेत आहेत. ही प्रवासी बस प्रवाशांनी भरलेली होती. तब्बल ४० प्रवासी गाडीमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस अधिक तपास करत आहेत.