नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना ; मॅरेथाॅन पंचनाम्यानंतर आढळला ४५ लाखांच्या अफूचा साठा

उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना मसावद पोलीस ठाण्याअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. म्हणून रविवारी सायंकाळी म्हसावद शिवारातील शिरुड तह या गावात शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार व अन्य काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांनी छापा टाकला.

    नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात ऐतिहासिक ठरणाऱ्या अफूच्या शेतीचा पंचनाम अखेर पूर्ण झाला असून, ७२ तासांहून अधिकवेळ चाललेल्या मॅरेथॉन पंचनाम्यानंतर सुमारे ४ हजार ३७४ किलो वजनाचा अफु पिकवल्याप्रकरणी आज पहाटे ३.२० वाजता शेतमालक अवलसिंग भिल आणि रहेमसिंग भिल या दोघांविरोधात हा गुन्हा नोंवण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ४५ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात अाल्याची मािहती पाेिलसांनी दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार म्हसावद पोलिस ठाण्यातील नोंदीत म्हटले आहे की, अवलसिंग नवलसिंग भिल आणि रहेमसिंग जालमसिंग भिल, दोन्ही रा. शिरुड, ता. शहादा यांनी अनुक्रमे क्रमांक २८/१ आणि २८/२ गटातील शेतात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक अफुची बेकायदेशीररित्या लागवड केल्याचे आढळले. यात अवलसिंग यांच्या शेतात ओले हिरवे अफु बोंड असलेले ३ ते ५ फुट उंचीचे ४६८० किलोग्रॅम वजनाचे व एकुण २३ लाख ४० हजार रुपये किंमतीचे अफु पिक तर रहेमसिंग याच्या शेतात २१ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे अफु पीक आढळले. म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी व मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तत्पूर्वी ७ मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपासून ९ मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत पिकाची कापणी मोजणी आणि पंचनामा चालू होता. २० किलोच्या २३४ गोण्या व १८ किलो वजनाच्या १२४ गोण्यांमध्ये सर्व अफुची बोंडे बांधण्यात आले असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार हे स्वत: नजर ठेऊन आहेत.

    काय आहे घटना?
    उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना मसावद पोलीस ठाण्याअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. म्हणून रविवारी सायंकाळी म्हसावद शिवारातील शिरुड तह या गावात शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार व अन्य काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांनी छापा टाकला. सुमारे साडेसात एकरात अफूची शेती करण्यात येत असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला. शिरुड तर्फे हवेली हे गाव अतिदुर्गम भागात तोरणमाळ रस्त्याला म्हसावद पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. आजूबाजूला मका आणि शेतीच्या मध्यभागात अफूचे पीक आढळून आले. बाहेरून आलेल्या काही मेंढपाळ लोकांनी ही शेती भाडेकराराने घेतली असून त्यांनी अफूची लागवड केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. तथापि सध्या शेत मालकांची चौकशी करण्यात येत आहे.