ऑक्सिजन निर्मितीबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल; भाजपा राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हीना गावीत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नवापूर , तळोदा येथील ऑक्सिजन निर्मिंती प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी या प्रकल्पांचे काम अजून सुरु व्हायचे आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्याला धुळे जिल्ह्यातून दररोज २ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा चालू आहे. नवापूरसाठी गुजरात मधून दररोज ७० ते ८० सिलिंडर मागवले जात आहेत. असे असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नंदुरबार जिल्हा ऑक्सिजन निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले जात आहे.

  नंदूरबार : ऑक्सिजन निर्मितीबाबत जिल्हा स्वयंपूर्ण झाला असल्याची दिशाभूल करणारी माहिती  नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसारीत केली जात आहे, अशी तक्रार भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हीना गावीत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

  वस्तुस्थिती तशी नाही

  या पत्रात खा. डॉ. गावीत यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता ओळखून त्यानुसार वेळीच  नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु केल्याचे नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसारमाध्यमांना सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. पहिल्या लाटेत जिल्हा सप्टेंबर २०२० मध्ये जिल्हा नियोजन व विकास निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प नोव्हे २०२० मध्ये कार्यान्वित झाला. दुसऱ्या लाटेत जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भोये यांनी पुन्हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ३ मार्च २०२१ रोजी जिल्हा आपत्ती निवारण निधीतून दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यास मान्यता दिली गेली.

  हा प्रकल्प ४ एप्रिल रोजी सुरु झाला. शहादा येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यास जिल्हा विकास व नियोजन मंडळाने २६ मार्च रोजी मान्यता दिली. हा प्रकल्प २० एप्रिल रोजी सुरु झाला. या खेरीज नंदुरबार येथे जिल्हा आपत्ती निवारण निधीतून १६ एप्रिल रोजी लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यास मान्यता दिली गेली. हा प्रकल्प सुरु होण्यास अजून महिना तरी लागेल.

  सातत्याने दिशाभूल

  नवापूर , तळोदा येथील ऑक्सिजन निर्मिंती प्रकल्प सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी या प्रकल्पांचे काम अजून सुरु व्हायचे आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्याला धुळे जिल्ह्यातून दररोज २ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा चालू आहे. नवापूरसाठी गुजरात मधून दररोज ७० ते ८० सिलिंडर मागवले जात आहेत. असे असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नंदुरबार जिल्हा ऑक्सिजन निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले जात आहे.

  याबाबत मी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडली असता जिल्हाधिकाऱ्यांनी ३ एप्रिल रोजी  नंदुरबार जिल्हा ऑक्सिजन निर्मितीबाबत स्वयंपूर्ण असल्याचे आपण कधीच म्हटले नव्हते, असे सांगितले होते. प्रसार माध्यमांमधून नंदुरबार जिल्हा ऑक्सिजन निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाला , अशा बातम्या प्रसारीत होत असताना जिल्हाधिकारी गप्प का बसले ? त्यांनी याबाबत खुलासा का केला नाही ? जिल्हाधिकारी या संदर्भात सातत्याने दिशाभूल करीत आहेत . त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला बाहेरून ऑक्सिजन पुरवठा होण्यात अडथळे येत आहेत, असेही खा. डॉ. गावीत यांनी या पत्रात नमूद केले आहे.