गरोदर मातेचा विव्हळत मृत्यू ; रूग्णवाहिका चालक बाजारात व्यस्त

मंदाणे येथे रुग्णवाहिका (Ambulance ) वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका गरोदर (pregnant) मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला होता. रुग्णवाहिका येण्यास दोन तास लागतील, असे उत्तर त्यांना मिळाले. त्यानंतर चौकशी केली असता रुग्णवाहिका चालक यावेळी खरेदी करण्यात व्यस्त असल्याची माहिती समोर असल्याने खळबळ उडाली आहे.

नंदुरबार : मंदाणे येथे रुग्णवाहिका (Ambulance ) वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका गरोदर (pregnant) मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला होता. रुग्णवाहिका येण्यास दोन तास लागतील, असे उत्तर त्यांना मिळाले. त्यानंतर चौकशी केली असता रुग्णवाहिका चालक यावेळी खरेदी करण्यात व्यस्त असल्याची माहिती समोर असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चौकशी करून रुग्णवाहिकेचा चालक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी आ. राजेश पाडवी (Rajesh Padavi) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अक्कलकोट (ता. शहादा) येथील प्रमिलाबाई युवराज वसावे या गरोदरमातेला शुक्रवारी सकाळी त्रास जाणवू लागला. तिच्या नातेवाइकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानुसार रुग्णवाहिका (एमएच १४, सीएल १०५८) वरील चालक राजू वाडीले व वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील यांच्याशी गरोदरमातेच्या नातेवाइकांनी येण्यासाठी विनंती केली. कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेच्या नातेवाइकांना घटनास्थळी पोहोचण्यास एक ते दोन तास लागतील, असे सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी आमदार राजेश पाडवी व त्यांचे स्वीय साहाय्यक हेमराज पवार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

स्वीय साहाय्यक पवार यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेवरील चालक व वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती मिळवली असा चालक राजू वाडीले बाजारात खरेदी करताना व वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील घरी आंघोळीत व्यस्त असल्याची माहिती मिळाली. वाटेतच प्रसूती गरोदर महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला खासगी वाहनाने लक्कटकोट येथून म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच संबंधित महिला रिक्षातच प्रसूती झाली. त्यात महिलेने एका नवजात बाळाला जन्म दिला.

पुढे म्हसावद ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलेला नेले. मात्र, वेळेवर पोचू न शकल्याने संबंधित महिलेने व तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला. सदर घटनेप्रकरणी जबाबदार असलेले १०८ रुग्णवाहिकेवरील संबंधित बेजबाबदार चालक व वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी होऊन गरोदर महिला व बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चालक व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार पाडवी यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.