पंचवटीत १००० बेडचे कोरोना केअर सेंटर, २०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा ; भाजप गटनेते  जगदीश पाटील यांची आयुक्तांकडे मागणी

पंचवटीतील मेरी कोविड सेंटर जास्त क्षमतेने त्वरीत सुरु करणेत येऊन तेथे व पंचवटीतील मनपाच्या इतर रुणालयांमरध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन बेडची व कोविड चाचण्यांची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

    पंचवटी : राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने मनपा प्रशासनाने पंचवटीत एक हजार बेडचे सीसीसी सेंटर व २०० ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने उपलब्ध करून दयावी अशी मागणी भाजप गटनेते तथा प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक जगदीश पाटील यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे पत्रकानव्ये केली आहे.

    नाशिक महानगरपालिकेतील सहा विभागांमध्ये पंचवटी विभाग सर्वात जास्त लोकसंख्येचा व क्षेत्रफळाचा प्रभाग असून पंचवटी परिसर झोपडपट्टया, छोटी खेडी व अनेक मोठ्या कॉलन्यांचा आहे. अगोदरच्या कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये पंचवटी विभागामध्ये पंजाबराव देशमुख वसतिगृह वगळता फक्त प्राथमिक स्वरूपातील व्यवस्था करूनच कोरोना संसर्गीत रुग्णांची १५० बेडची व्यवस्था केलेली होती. तसेच पहिल्या कोरोना संसर्गाच्या लाटेत आणि त्यानंतर आलेल्या दूसर्या लाटेत देखील मनपाने ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो व तेथे ऑक्सिजन बेडच्या नावाखाली रुग्णांची लूट होते. त्यामुळे मनपाने आपल्या मालकीच्या इंदिरा गांधी रुग्णालय व मायको दवाखाना रुग्णालय येथे ऑक्सिजन व्यवस्था करावी जेणेकरून पंचवटीतील रुग्णांना ऑक्सीजन बेड साठी शहरात इतरत्र भटकावे लागणार नाही.आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी त्वरित ऑक्सीजन बेडची व्यवस्था करावी. पंचवटीची लोकसंख्या बघता मागील वेळी कोविड सेंटरची संख्या अपूर्ण होती त्यामुळे येथील बरेच रुग्ण शहरात लांबच्या ठिकाणी इतरत्र उपचारासाठी दाखल होत होते. तशीच परिस्थिती आजही असून प्रशासनाने पंचवटीतील नागरिकांसाठी १००० बेडचे कोविड सेंटर व २०० ऑक्सिजन बेडची तातडीने व्यवस्था करावी. पंचवटी येथील ५ ते ६ लक्ष लोकसंख्येच्या तुलनेने नाशिक मनपाच्या वतीने यापूर्वी साधारणत: फक्त दीडशे बेडची व्यवस्था केलेली होती ती अतिशय अपुरी होती. त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.साधारणत: पंचवटीतील सर्व खेडे व कॉलन्या बघता 1000 बेडची व्यवस्था फक्त पंचवटी विभागासाठी आवश्यक आहे.कोरोनाची दुसरी लाट हि पहिल्या आलेल्या लाटेपेक्षाही मोठी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भविष्यात रुग्णांची गैरसोय होणार नाही याकरीता सक्षमतेने उपाय करणे गरजेचे आहे. सदरच्या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पंचवटीतील मेरी कोविड सेंटर जास्त क्षमतेने त्वरीत सुरु करणेत येऊन तेथे व पंचवटीतील मनपाच्या इतर रुणालयांमरध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन बेडची व कोविड चाचण्यांची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.