pickup and bus accident

गतपुरी तालुक्यातील खेड भैरव आणि अधरवड येथील तिघेजण महिंद्रा पिकअपने क्र. एमएच १५ एजी ९४७७ नाशिक कडून घोटीकडे येत असतांना रोथे कंपनीसमोर पिकअप वाहनाचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

घोटी : घोटी-नाशिक (Ghoti-Nashik highway) महामार्गावरील वाडीव पोलीस स्टेशनच्या हद्दित रोथे एर्ड कंपनी (जुनी रेमंड)समोर भीषण अपघात झाला आहे. पिकअप आणि लक्झरी बस (pickup and bus accident) यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार (2 killed)  तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव आणि अधरवड येथील तिघेजण महिंद्रा पिकअपने क्र. एमएच १५ एजी ९४७७ नाशिक कडून घोटीकडे येत असतांना रोथे कंपनीसमोर पिकअप वाहनाचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पिकअप महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलिकडील मुंबईकडून इंदौरला जाणाऱ्या लक्झरी बस (एमपी ३० पी २४७७ ) वर जाऊन आदळली.

या अपघातात पीकअपमधील योगेश दामू वाजे (३५ रा. खेडभैरव) आणि किरण शिवाजी ब-हे (३० रा. अधरवड ता. इगतपुरी) या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. तर संदीप यशवंत केकरे (२७ ता. इगतपुरी) हा पिकअपमधील तरुण जखमी झाला. बसमधील फ्रैंक डी. रिजारियो (रा. मुंबई), लक्झरी बसचालक रमेश दयाराम यादव, नितीन धोपटे (सर्व रा. इंदौर) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रुग्नवाहिका आणि घोटी टोल नाका रुग्णवाहिका या अपघात स्थळी दाखल झाल्या. जखमीना तात्काळ स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले.

अपघात इतका भीषण होता की, पीकअप वाहनाचा चक्काचूर झाला तर बस बाजूला खड्यात जावून आदळली. बसमधील प्रवाशी दिवाळीसाठी मुंबईहून इंदौरला चालले होते. बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. वाडीव-हे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील करीत आहे.

या अपघातात मयत झालेले योगेश दामू वाजे व किरण शिवाजी ब-हे हे दोघेही युवा सेनेचे पदाधिकारी आहे. हे दोघेही जवळचे नातलग असून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी नाशिकला गेले होते. नाशिकहून परतत असताना हा अपघात झाला. या युवकांच्या मृत्यूमुळे खेडभैरव, व अधरवड गावात व टाकेद परिसरात शोककळा पसरली आहे.