पुणे-नाशिक व कोल्हार-घोटी मार्गांवरील अपघातांत २०२० मध्ये ३७ जणांचा बळी

-४० जण जखमी; विविध कारणांमुळे अपघातांच्या संख्येत होतेय दिवसेंदिवस वाढ

राजू नरवडे , संगमनेर : संपूर्ण देशभरात मालाची वाहतूक करण्यासाठी महामार्ग आणि राज्य मार्गांचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण असणार्‍या पुणे व नाशिक या दोन महानगरांना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जोडले आहे. तर कोल्हार-घोटी राज्यमार्गाने अहमदनगर व नाशिक जिल्ह्याला जवळ केले आहे. दोन्हीही मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी व माल वाहतूक होत असल्याने नेहमीच वर्दळ असते. दरम्यान, सरत्या वर्षात (२०२०) सुमारे ५० अपघातांमध्ये ३७ जणांचे बळी गेले आहे तर ४० जण जखमी झाले आहेत. विविध कारणांमुळे हे अपघात झाल्याचे डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग व कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील सरते वर्ष २०२० मधील अपघातांची आकडेवारी जाणून घेतली असता; जानेवारी महिन्यात ५ अपघातांत ४ मयत आणि १ जखमी, फेब्रुवारीमध्ये ९ अपघातांत ५ मयत आणि ६ जखमी, मार्चमध्ये ५ अपघातांत ५ मयत आणि ० जखमी, एप्रिलमध्ये एकही अपघात नाही, मे मध्ये ३ अपघातांत २ मयत आणि १ जखमी, जूनमध्ये ८ अपघातांत ७ मयत आणि १ जखमी, जुलैमध्ये २ अपघातांत १ मयत आणि २ जखमी, ऑगस्टमध्ये ४ अपघातांत ४ मयत आणि ० जखमी, सप्टेंबरमध्ये ४ अपघातांत ४ मयत आणि ० जखमी, ऑक्टोबरमध्ये ४ अपघातांत २ मयत आणि २ जखमी, नोव्हेंबरमध्ये २ मयत तर डिसेंबर महिन्यामध्ये ३ असे एकूण ३७ मयत झाल्याची नोंद झाली आहे.

वाहन चालविताना चालक व प्रवाशांसाठी शासनाने नियम घालून दिलेले आहेत. तरी देखील अनेक वाहनचालक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. अनेकदा वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालत असल्याचेही प्रकार झालेले आहेत. प्रवास करताना अतिवेगाने वाहन चालविणे, वळणावर पुढील वाहनाला मागे टाकणे (ओव्हरटेक), वेगावर नियंत्रण न झाल्याने वळणावर वाहन पलटी होणे, पुढे जाणार्‍या ट्रक किंवा जड वाहनाला पाठीमागून धडकणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, जड वाहनाला पाठीमागून परावर्तक (रिफलेक्टर) नसल्याने अंधारात वळणावर वाहने दिसून न येणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, वाहनांची नादुरुस्ती आणि दरड कोसळणे अशी प्रमुख कारणे अपघातांस कारणीभूत ठरत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे. वारंवार प्रबोधन करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुनही वाहनचालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे अपघात वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

याचबरोबर सद्यस्थितीत महामार्गांची दुरावस्था वाईट झालेली असल्याने अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी संबंधित महामार्गाची देखभाल करणार्‍या कंपनी अथवा ठेकेदाराने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिकांनी आणि माध्यमांनी आवाज उठवूनही कामे अपूर्ण असल्याने निष्पाप जिवांचा नाहक बळी जात आहे. म्हणून प्रशासनाने प्रबोधनाबरोबर महामार्गांच्या दुरुस्तीसाठी पावले उचलून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही अपघातग्रस्तांनी व्यक्त केली आहे.

डोळासणे महामार्ग पोलिसांच्या नियंत्रणात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते कर्‍हे घाट अशी ६६ किलोमीटरची हद्द तर कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील कोकणगाव ते बारी घाट अशी ७० किलोमीटरची हद्द येते. या अंतर्गत संपूर्ण वर्षभरात (२०२०) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १ कोटी ९० लाख ६९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनेकदा प्रबोधनासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. तरी देखील वाहनचालक सर्रासपणे नियमांना पायदळी तुडवत असतात. यातून दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होते.

- भालचंद्र शिंदे , पोलीस उपनिरीक्षक , डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्र