मनमाडच्या जवानास वीरमरण, पंचक्रोशीत शोककळा

मनमाडच्या जवानाला कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. रात्रीच्या अंधारात कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातातून ते बचावू शकले नाहीत. त्यांनी देशासाठी दिलेलं प्राणाचं बलिदान कायम सर्वांच्या लक्षात राहिल.

मनमाड : मनमाडजवळ असलेल्या अस्तगावमधील लष्करी जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील नवसेरा सेक्टरमध्ये येथे कर्तव्य  बजावत असताना त्यांना वीरमरण आले. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती.

या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सेनेच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गंभीर दुखापतीतून ते बरे होऊ शकले नाहीत. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते.

नांदगाव तालुक्यात त्यांच्या मृत्यूची बातमी येताच अस्तगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. २००६ साली ते सेनेत दाखल झाले होते. सध्या मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कार्यरत असताना रात्री गस्तीवर असतांना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या मागे आई,  वडील पत्नी, ९ वर्षाची मुलगी,  भाऊ आणि  दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.