अब्दुल सत्तार यांच्याकडून खडसेंना शिवसेना प्रवेशाचं निमंत्रण

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं पुन्हा पुन्हा सांगायला नको. खडसे यांचा भाजपामध्ये अन्याय झाला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युती तुटली. आता खडसे यांनी भाजपा पक्ष सोडून शिवसेनेत यावे. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल. आम्ही शिवसेनेत त्यांचे स्वागत करु. असे सत्तार म्हणाले आहेत.

सत्तार पुढे म्हणाले की, खडसे यांच्यावर भाजपात अन्याय झाला आहे. त्यांचं भवितव्य चांगलं आहे. एकनाथ खडसे यांनी ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत यावं. त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.