प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयात १५ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची ६४ विद्यार्थी प्रवेशक्षमता असणार आहे. या एकूण १५ विषयांमध्ये औषध शास्त्र, शल्य चिकित्सा शास्त्र, भुल शास्त्र, रोगनिदान शास्त्र, स्त्रीरोग चिकित्सा व प्रसुती शास्त्र यांना प्रत्येकी ६ जागा, बालरोग चिकीत्सा शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, कान, नाक, घसा, शास्त्र, नेत्रचिकित्सा, क्ष - किरण शास्त्र, त्वचारोग शास्त्र, सुक्ष्मजिव शास्त्र यांना प्रत्येकी ०४, जैवरसायन शास्त्र, औषध निर्माण शास्त्र, न्यायवैद्यक औषध शास्त्र यांना ०२ अशा एकूण ६४ जागा असणार आहे.

  नाशिक : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रूग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला असुन त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

  पालकमंत्र्यांचा यशस्वी पाठपुरावा
  यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांप्रमाणे १००० लोकसंख्येसाठी १ डॉक्टर असणे आवश्यक आहे. सद्य : स्थितीत राज्याच्या लोकसंख्येचा विचार केल्यास प्रति १००० लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण ०.६४ इतके म्हणजेच मानकांपेक्षा कमी आहे. राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्याच्या निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात अडचणी निर्माण होतात. राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेता नाशिकमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणे गरजेचे होते. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष प्रयत्न होते.

  विद्यार्थी क्षमता १०० तर ४३० खाटांचे रूग्णालय
  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रूग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय हे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त स्थापन करण्यात येईल. तसेच सदर महाविद्यालय व रुग्णालय, दैनंदिन परिचालन व व्यवस्थापन यासाठी स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे सर्वसाधारण पर्यवेक्षण, व्यवस्थापन व नियंत्रण करणारी यंत्रणा असणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालयाकरीता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक असलेले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास तात्पुरत्या स्वरूपात निःशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  ६२७.६२ कोटी इतका खर्च
  प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे रुपये ६२७.६२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीनुसार विद्यापीठामार्फत अभ्यासक्रमाचे व इतर शुल्क निश्चीत करून आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शुल्क व इतर बाबींमार्फत निर्माण होणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतामार्फत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाचे व्यवस्थापन, संचालन आदी सर्वप्रकारच्या आवर्ती खर्चासाठी कायमस्वरूपी तरतूद आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेची अट शिथील करून या महाविद्यालयासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत शासन मान्यतेने आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि विद्यापीठास पदे भरण्यास मान्यता देखिल देण्यात आली आहे.

  महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती
  महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. हे महाविद्यालय व अनुषंगिक रुग्णालयाच्या बांधकामासाठी २६३.११ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तर यंत्रसामग्री आणि उपकरणांची १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय, केंद्रीय वित्त मंत्रालयाने नव्याने घोषित केलेल्या योजनेमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठास खाजगी भागीदार गृहीत धरून सदर वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय उभारणीसाठी अनावर्ती खर्चासाठी ४० टक्के व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि प्रथम पाच वर्षांसाठी आवर्ती खर्चासाठी २५ टक्के व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासन किंवा निती आयोगास नाविण्यपूर्ण विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करण्यास देखिल मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांकरिता आवश्यक असणारी स्वच्छता, आहार, सुरक्षा, वस्त्र, स्वच्छता ही सर्व कामे बाह्यस्त्रोतामार्फत राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास मंजुरी देण्यात येऊन सदर वैद्यकीय पदव्युत्तर पदवी संस्थेचे नाव महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक असे देण्यात आले आहे.

  १५ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
  संस्था ही राज्यातील उत्कृष्टता केंद्र म्हणून स्थापन करण्यात येऊन ह्या संस्थेमार्फत वैद्यकीय शिक्षण अध्यापनाची पध्दत विकसीत करण्यात येईल. तसेच विविध शाखांतील वैद्यकीय विशेषज्ञांची निर्मिती करण्यावर सदर संस्थेचा भर राहील. या नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयात १५ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची ६४ विद्यार्थी प्रवेशक्षमता असणार आहे. या एकूण १५ विषयांमध्ये औषध शास्त्र, शल्य चिकित्सा शास्त्र, भुल शास्त्र, रोगनिदान शास्त्र, स्त्रीरोग चिकित्सा व प्रसुती शास्त्र यांना प्रत्येकी ६ जागा, बालरोग चिकीत्सा शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, कान, नाक, घसा, शास्त्र, नेत्रचिकित्सा, क्ष – किरण शास्त्र, त्वचारोग शास्त्र, सुक्ष्मजिव शास्त्र यांना प्रत्येकी ०४, जैवरसायन शास्त्र, औषध निर्माण शास्त्र, न्यायवैद्यक औषध शास्त्र यांना ०२ अशा एकूण ६४ जागा असणार आहे.