‘सिक्स सिग्मा’ रुग्णालयाची चाैकशी करा अन्यथा.. ; कृषीमंत्री दादा भुुुसे यांचा आंदोलनाचा इशारा

धांद्री येथील रुग्णाच्या मुलाने जीवनदायी योजनेतून लाभ द्यावा अशी विनंती डॉक्टरांकडे केली असता त्यांनी योजना नसल्याचे सांगत त्यांच्याकडून रुग्णालयाचे डिपाॅझीट १ लाख ७० हजार रूपये भरण्यास सांगितले. रूग्ण सोडतेवेळी उर्वरित २ लाख ८० हजार रूपये असे संपूर्ण बील घेतल्यानंतरच रूग्णाला सोडण्यात आले. रूग्णालयात सावळा गोंधळ असून रूग्णालयाची चौकशी चार दिवसात करा अशा सुचना प्रशासनास दिल्या असून चार दिवसात चौकशी न झाल्यास शिवसैनिकांच्या समवेत स्वतः आंदोलनात उतरण्याची ग्वाही भुसे यांनी दिली.

  मालेगाव : महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी योजनेचा समावेश असलेल्या शहरातील सिक्स सिग्मा रूग्णालय प्रशासनाने रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना योजनेचा लाभ न देता प्रत्यक्षात लाभ दिला आहे, असे दाखवून शासनाकडून २ कोटी ४३ लाख ९९ हजार ४० रूपये पदरात पाडून घेतले आहेत. रुग्णांची लुट करणाऱ्या या रुग्णालयाची चार दिवसांत चौकशी करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. भुसे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवार दि.७ शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना भुसे यांनी ही चाैकशी झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

  खाेटी कागदपत्रे सादर केली
  मालेगाव शहरातील काही खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी कृषीमंत्री भुसे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर ना. भुसे यांनी २८ मे रोजी ये सिक्स सिग्मा रुग्णालयास भेट देऊन बिल आकारणीची तपासणी केली होती. यावेळी रूग्णांकडून लाखो रूपयांचे बिल आकारणी करण्यात येत असल्याचे उघड झाल्याने भुसे यांनी रूग्णालयातील कारभाराची चौकशी करण्याचे आदेश पोलीस व महापालिका आधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान आठवडा उलटून देखील प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने शिवसेना पदाधिकारी यांच्यासह नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत होता. सोमवारी झालेल्या बैठकीत प्रामुख्याने पदाधिका-यांनी रूग्णालयाकडून होत असलेल्या लुटीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या रुग्णालयांवर कारवाई न करणा-या अधिका-यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आंदोलनाचा पवित्र घेतला होता. अखेर यावेळी ना. भुसे यांनी पदाधिका-यांना संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे ना. भुसे यांनी सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. एकाच छताखाली सिक्स सिग्मा व सनराईज रूग्णालय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यात सिक्स सिग्मा रूग्णालय धुळे येथे शिक्षण घेणाऱ्या डॉ. मयुर पाटील यांच्या नावाने खोटे कागदपत्र तयार करून सुरू असल्याचे तर सनराईज रूग्णालयाबरोबरच येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी असणाऱ्या डॉ. अभय पोतदार यांच्या नावाने सुरू असल्याचे उघड झाले आहे.

  रुग्णांना लाभ दिला नाही
  राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर येथील सिक्स सिग्मा मल्टी स्पेशालीटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. याच रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी केली जाते. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या नंतर ना. भुसे यांनी तपासणी केली असता त्यात तथ्ये असल्याचे आढळून आले. कोरोना बरोबरच येथील सिक्स सिग्मा मल्टी स्पेशालीटी रूग्णालयात विविध आजारांवर उपचार केले जातात. याच रुग्णालयाला शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य सुविधा योजनेचा लाभ दिला जातो. आज पर्यंत या रुग्णालयात १ हजार ४८६ रुग्णांनी जीवनदायी योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पोटी शासनाने २ कोटी ४३ लाख ९९ हजार ४० रूपये दिले आहेत. प्रत्यक्षात येथे दाखल असलेल्या रुग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ दिला जात नाही.

  स्वत: आंदोलनात उतरणार
  धांद्री येथील रुग्णाच्या मुलाने जीवनदायी योजनेतून लाभ द्यावा अशी विनंती डॉक्टरांकडे केली असता त्यांनी योजना नसल्याचे सांगत त्यांच्याकडून रुग्णालयाचे डिपाॅझीट १ लाख ७० हजार रूपये भरण्यास सांगितले. रूग्ण सोडतेवेळी उर्वरित २ लाख ८० हजार रूपये असे संपूर्ण बील घेतल्यानंतरच रूग्णाला सोडण्यात आले. रूग्णालयात सावळा गोंधळ असून रूग्णालयाची चौकशी चार दिवसात करा अशा सुचना प्रशासनास दिल्या असून चार दिवसात चौकशी न झाल्यास शिवसैनिकांच्या समवेत स्वतः आंदोलनात उतरण्याची ग्वाही भुसे यांनी दिली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, महानगरप्रमुख रामा मिस्तरी यांनी आपली भूमिका मांडली. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.