अजित पवारांचा संस्थाचालकांना सल्ला ; पवारांचे नाव दिले आहे त्याला साजेसे काम करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी सांगितलेल्या अडचणींचा उल्लेख केला. हे सर्व प्रश्न विविध विभागाच्या मंत्र्यांशी संबंधीत आहेत. त्यांच्याकडे ते सुटतील याची दक्षता घेऊ. पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. त्यामुळे काळजी नाही. हे प्रश्न निश्चित सोडवू. शिक्षण संस्थेतून एक दर्जेदार पिढी घडविण्याचे काम आपण सर्व करू, असे सांगत पाच कोटी रुपये मदत जाहीर केली.

  नाशिक : संस्थेच्या माहविद्यालयाला शरद पवार यांचे नाव दिले आहे. त्याला साजेसे काम त्या महाविद्यालयत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व संस्थाचालकांनी केले पाहिजे. त्यावर बारीक लक्ष ठेवावे. या संस्थेत अनेकांनी सहाय्य केले. शरद पवार तर गेली पन्नास वर्षे लोकांमध्ये काम करीत आहेत. सत्तेत असो वा नसो, शेतक-यांच्या मदतीला ते धाऊन जातात. मदत करतात. आपत्तीत बांधावर जातात. शिक्षणाच्या कामाला तर ते नेहमीच मदत करतात. त्यामुळे पवार कोणी एका समाजाचे नव्हे तर सबंध महाराष्ट्राचे झाले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शरदचंद्र पवार काॅलेज ऑफ आर्किटेक्चर, राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक आणि उदाजी महाराज पवार मराठा शैक्षणिक वारसा संग्रहालयाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

  समाेरही पवार असतीलच!
  या महाविद्यालयाला शरद पवारांचे नाव दिले. निलीमाताई पवार यांनी प्रास्तविक केले. अजित पवार यांनी उद्घाटन केले. संस्थेच्या संग्रहालयाला नाव दिले उदाजी महाराज पवार, संस्थेचे माजी सरचिटणीस (कै.) वसंतराव पवार. अन‌् समोर देखील काही पवार असतील ना?. हे सगळे तुमचे प्रेम आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपसि्थतांना हसवले. ते पुढे म्हणाले की, ही संस्था १०७ वर्षाची झाली. त्यात छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांपासून तर वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यापर्यंत अनेकांनी त्यात योगदान दिले. सामाजिक प्रेरणा देण्याचे काम करताना अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथांच्या विरोधात तसेच बहुजन वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात व बळ देण्याचे काम शाहू महाराजांनी केली. हेच कार्य संस्थेचे पदाधिकारी पुढे नेत आहेत.

  ५ काेटींची मदत
  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी सांगितलेल्या अडचणींचा उल्लेख केला. हे सर्व प्रश्न विविध विभागाच्या मंत्र्यांशी संबंधीत आहेत. त्यांच्याकडे ते सुटतील याची दक्षता घेऊ. पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. त्यामुळे काळजी नाही. हे प्रश्न निश्चित सोडवू. शिक्षण संस्थेतून एक दर्जेदार पिढी घडविण्याचे काम आपण सर्व करू, असे सांगत पाच कोटी रुपये मदत जाहीर केली.

  यावेळी विधानसभेचे प्रभारी सभापती नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस निलीमाताई पवार, चिटणीस डॉ सुनिल ढिकले, उपसभापती राघो नाना अहिरे, आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार नितीन पवार, आमदार नरेंद्र दराडे, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.