९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी – ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नाशिक: गोदानगरी येथे भरणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत होती, मात्र अखेर जयंत नारळीकर यांच्या नाव निश्चित झालं आहे.

नाशिक, की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती. त्यानंतर नाशिक येथे हे संमेलन करण्याचे निश्चत झाले. नाशिकमध्ये संमेलन व्हावे, यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले होते. या वर्षी सार्वजनिक वाचनालय इच्छुक नसल्याचे कळल्यावर लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीतील मराठी जनांना मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून सरहद्द संस्थेने मागील वर्षी आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली होती. किमान यंदातरी आपला विचार होईल असे दिल्लीकरांना वाटत होते. संमेलन नाशिकला मिळतेय हे समजल्यावर सरहद्द संस्थेने महामंडळाला प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठविले होते. अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केले.