बळीराजाचा ‘तारणहार’च ठरताेय ‘मरणहार’

मनमाड : बळीराजाचा खरा तारणहार पाऊस आणि हवामानाला मानले जाते. मात्र तारणहारच सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठून मरणहार करणारा ठरत असल्याचे चित्र यंदा जिल्ह्यात दिसून येत आहे.

बब्बू शेख , मनमाड : बळीराजाचा खरा तारणहार पाऊस आणि हवामानाला मानले जाते. मात्र तारणहारच सध्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठून मरणहार करणारा ठरत असल्याचे चित्र यंदा जिल्ह्यात दिसून येत आहे.
­­

गेल्या वर्षी पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाला मेटाकुटीला आला होता. तर यंदा अतिवृष्टीमुळे तो संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मका, बाजरी या पिकांसोबत झेंडू फुलांच्या शेतीलादेखील मोठ्या प्रमाणात बसला आहे त्यामुळे फुलांची लागवड करणारे हजारो शेतकरी हवालदिल झाले असूपंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

सणोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलानी जास्त मागणी असते. िवशेषत: दसरा-दिवाळी तर झेंडूच्या फुलाशिवाय साजरीच होत नाही. झेंडूच्या फुलांची लागवडीतून दोन पैसे जास्त मिळतात त्यामुळे मनमाड परिसरातील वंजारवाडी, सटाणे, हिसावळ, भालूर, बेजगाव यासह इतर भागातील हजारो शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड करतात. गेल्या वर्षी पावसा अभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे झेंडूच्या फुलांची जास्त लागवड करता आली नाही; मात्र यंदा सुरवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. फुलांचे पीकही जोरदार आल्याचे पाहून यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या सलग पावसाचा फटका मका, बाजरी पिकासोबत झेंडूच्या फुलांना देखील बसला. वादळी वारा आणि पावसाच्या फटक्यामुळे नाजूक असलेली फुलांच्या झाडांनी मान खाली टाकली तर अनेक शेतात झाडे जमीनदोस्त झाली आहे.अगोदरच लॉक डाऊनमुळे मंदिरे बंद असून सण उत्सवावर देखील काहीसे िनर्बंध आलेले असल्याने फुलांची मागणी कमी झालेली असताना आता परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे फुलांची लागवड करणारा शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या झेंडू फुल शेतीचे तातडीने पंचनामे कारून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दसरा–दिवाळीच्या सणासाठी मी गेल्या 20 वर्षांपासून झेंडूच्या फुलांची लागवड करीत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही एक एकरात फुलांची लागवड केली होती. झेंडूच्या फुलांची लागवड करण्यासाठी एकरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. चांगली मेहनत घेतल्यामुळे फुलांना चांगला बहर आला होता. त्यामुळे आपल्याला या वर्षी दोन पैसे हातात पडतील अशी अशा होती. मात्र दोन दिवसा पूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडे जमीनदोस्त झाली असल्याने मोठे नुकसान झाले आहे इतर पिकेही हातातून गेली असल्याने जगावे तरी कसे असा प्रश्न पडला आहे.

- रामदास जाधव, शेतकरी, वंजारवाडी