वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

मंगळवार (दि.१६) रोजी तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे घरगुती वीज बिलाची थकीत रक्कम असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे वसुलीसाठी गेले असता गवळी यांनी विज बिल भरण्यास नकार दिला.

    देवळा : वासोळ तालुका देवळा येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

    शिवगाळ, दमदाटी
    याबाबत अधिक मािहती अशी की, मंगळवार (दि.१६) रोजी तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे घरगुती वीज बिलाची थकीत रक्कम असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे वसुलीसाठी गेले असता गवळी यांनी विज बिल भरण्यास नकार दिला. तसेच सदर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. निकम यांनी शिवीगाळ करू नको, असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी इत्यादी घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

    अनर्थ टळला
    यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत.