जाऊबाईने नाकारलेल्या तिकिटावर डॉ. भारती पवार यांनी निवडणूक लढवली अन ‘खासदार’ ते केंद्रात ‘मंत्रीपदापर्यंत’ मजल मारली

भारती पवार यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व निवडून आल्या. आता आपल्या कर्तृत्वाने थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या आहेत.

    नाशिक: खासदार डॉ. भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने नाशिक जिल्ह्याच्या पदरात प्रथमच केंद्रीय मंत्रिपद पडल्याने जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. खासदार भारती पवार सन २०१९ मध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारत अन्य उमेदवार आयात केला. त्यामुळे भारती पवार यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला.

    विशेष म्हणजे भाजपच्या वतीने भारती पवार यांच्याआधी त्यांच्या जाऊ तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांना तिकिटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, जयश्री पवार यांनी तिकीट नाकारले. त्यामुळे भाजपकडून भारती पवार यांना विचारणा झाली. भारती पवार यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व निवडून आल्या. आता आपल्या कर्तृत्वाने थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या आहेत.


    सुशिक्षित व सुसंस्कृत लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा असून, त्यांनी लावलेला कामांचा झपाटा त्यांच्या निवडीसाठी महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे. खासदार भारती पवार या शरद पवार यांचे निकटवर्तीय व माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांच्या सुनबाई आहेत.