गणेशोत्सव साजरा करण्याबाबत छगन भुजबळ म्हणाले…

    नाशिक : राज्यात अद्यापही कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करत विघ्नहर्ता श्री गणेशाची स्थापना करत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. तसेच कोरोनाचे हे विघ्न लवकरच दूर होऊदे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.

    भुजबळ यांनी म्हटले की, श्री गणेशाच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, आणि भक्तीमय वातावरणात निर्माण होऊन सगळीकडे प्रसन्नता निर्माण होत असते. सर्वजण मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असून त्याबाबत शासनाकडून नागरिकांच्या सहकार्यातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करत आहे. त्यामुळे आपण काही प्रमाणात कोरोनाला रोखू शकलो आहे. मात्र, त्यावर थांबून चालणार नाही तर त्याचे मूळ नष्ट होईपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या या मंगल उत्सवात नियमांचं काटेकोर पालन करुन साजरा करूया.

    लवकरच श्री गणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गणेशोत्सव काळात सर्वांनी शांतता व सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.