…तर सगळेच बदनाम होतात; वाझे प्रकरणावर छगन भुजबळांचे भाष्य

    नाशिक : अँटिलियासमोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेनंतर तसेच पोलिस दलात झालेल्या बदल्यावरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज या प्रकरणावर प्रथमच भाष्य केले.

    काही अधिकारी चुकीचे वागले तरी सगळे बदनाम होतात. त्यामुळं तपास पूर्ण होऊ द्या, असे ते म्हणाले. दरम्यान, वाझे यांच्यावर कारवाई झाली असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

    भुजबळ यांनी यावेळी त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात घडलेल्या तेलगी मुद्रांक प्रकरणाचाही दाखला दिला. तेलगी प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त आर. एस. शर्मा यांचंही नाव आले होते. त्यामुळं त्यांची मोठी बदनामी झाली. मात्र, ते निर्दोष होते हे कालांतराने सिद्ध झाले, असे भुजबळ म्हणाले.

    दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर बोलताना राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. नाशिकमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लॉकडाऊन नको असेल तर बंधनं पाळायला हवीत. कोविड बरा होतो मात्र काहींना कायमचं दुखणे देतो, असे ते म्हणाले.