आपातकालीन निधीवरून भुजबळ-कांदेंमध्ये खडाजंगी

  नाशिक : नांदगाव (वा.) नांदगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात आपतकालीन निधीच्या मुद्यावरून जाेरदार खडाजंगी झाल्याने पालकमंत्र्यांचा दाैरा चांगलाच वादळी ठरला.

  पालकमंत्री भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तहसील कार्यलयात झालेल्या आढावा बैठकीचे आयाेजन केले हाेते. या बैठकीत भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. बैठकीनंतर आमदार कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

  नुकसानग्रस्त भागाची पाहणी

  गेल्या आठवड्यात नांदगाव शहरासोबत संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीसह व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जातपडे, साकोरा यांसह, नांदगाव शहराला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार यांच्यासह अधिकारी होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर तहसील कार्यलयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात भुजबळांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.

  निधीवरून वादंग

  यावेळी आमदार सुहास कांदे यांनी आपत्कालीन निधी देण्याची मागणी केली. उद्या जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निधीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर निधीच्या मुद्द्यावरून भुजबळ-कांदे या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बैठकीत गोंधळ उडाला होता. जवळपास 100 गावांत पुराचे पाणी घुसून शेतीसह नागरी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा पाहणी दौरा केला. त्यानंतर भुजबळ यांनी नांदगांव मतदारसंघातील जातपडे, साकोरा, वाखारी येथे जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरसकट पंचनामे करा अन्यथा लोकं सांगतील तेच ग्राह्य धरून त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी उपयोजना करा, असे आदेश दिले.