धार्मिक कार्मक्रमांवरील बंदी उठविण्याची मागणी

कोणताही धार्मिक पंथ असो यावर शासनाने एक प्रकारे निर्बध लावून अन्यायच केला आहे. एकीकडे बाजारपेठ, राजकीय सभा, लग्न, उत्सव अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. शासनाने बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्यामुळे तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रतील संपूर्ण वारकरी समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

    देवळा : कोरोनामुळे निर्बंध घातलेल्या धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ व देवळा तालुक्यातील वारकरी बांधवांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक गोष्टीवर बंधने घातली, त्यात मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय योग्य होता, मात्र इतर बाबींचा विचार केला तर लग्न, छोटे-मोठे समारंभ सर्वत्र मोठ्या गर्दीत साजरे होत असून कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असतांना फक्त धार्मिक कार्यक्रमांमुळेच कोरोना संसर्ग वाढते का? असा प्रश्न वारकरी संप्रदायाकडून विचारला जात आहे.

    कोणताही धार्मिक पंथ असो यावर शासनाने एक प्रकारे निर्बध लावून अन्यायच केला आहे. एकीकडे बाजारपेठ, राजकीय सभा, लग्न, उत्सव अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. शासनाने बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्यामुळे तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रतील संपूर्ण वारकरी समाजावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्यामुळे वारकरी संप्रदायाकडून शासनाचा निषेध करण्यात आला.

    शासनाने धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर वारकरी समाज संप्रदायाचे तालुकाध्यक्ष हभप अविनाश महाजन, जिल्हा मार्गदर्शक हभप संजय धोंडगे, तात्या भाऊ सावंत, सुभाष बच्छाव, पुंडलिक सानप , विलास जोशी, दिनकर पगार, नारायण जाधव, किसन आहेर, काकाजी शिंदे, भास्कर शिंदे, दादाभाऊ आहेर, सुदाम महाराज, रामनाथ महाराज, बापू महाराज कुंभार्डेकर गोविंद महाराज कुंभार्डेकर, गणेश महाराज गणेश पुरीजी देवदारेश्वर, गोरख निकम, हिरामण गांगुर्डे, चंद्रकांत सावंत, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.