देवेंद्र फडणवीस कायदेतज्ज्ञ; अटकेच्या आदेशावर पोलिस आयुक्त पांडे ठाम

  नाशिक (वा.) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कायदेतज्ज्ञ आहेत. तरीही मी माझ्या भूमिकेवर ठाम असून, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी काढलेले आदेश हे कायदेशीर आहेत. जर त्यांना माझा आदेश बेकायदेशीर वाटत असेल तर ते या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असे म्हणत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आमच्या तपासाला सहकार्याची भूमिका आहे. जामीन मिळाल्याने अटक टळली असली तर, नाशिक मधील गुन्ह्यात जबाबासाठी येत्या गुरुवारी (ता.२) सप्टेंबरला त्यांना नाशिक पोलिसांसमोर यावे लागणार आहे. नाशिक पोलिस पथकाने तशी नोटीस त्यांना बजावली आहे. अशी माहीती पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.

  कायद्याप्रमाणेच नोटीस

  दोन दिवसांपासून सुरु असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्याच्या अनुषंगाने आज पत्रकारांशी बोलत होते. पांडे म्हणाले की, विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांचे पोलिसांना सहकार्य आहे. पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलिस पथक गेले होते. हे पथक संगमेश्वरला पोहचले असतांना त्यांना समजले की, राणे यांना रायगड पोलीस घेऊन गेले होते. त्यामुळे तेथील कारवाईबाबत सुनावणी सुरु झाली. न्यायालयात नाशिक पोलिसांनी भूमिका मांडून २ सप्टेंबरला हजर राहण्याचे विनंती केली. त्यानुसारत्यांनी यायचे आहे.

  मंत्री महोदयांची सहकार्याची भूमिका असल्याने आम्ही त्याचा आदर करतो. मी कायद्याला धरून नोटीस काढली आहे. रायगड पोलिसांची न्यायालयीन कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. न्यायालयात नाशिक पोलिसांनी भूमिका मांडली. राणे यांनीही पोलिस तपासाला सहकार्य केले. त्यांना दिलेल्या नोटीसवर त्यांनी सहीदेखील केली आहे. त्यांचे तपासाला सहकार्य करीत असल्याने आम्ही समाधानी आहोत. नाशिकमध्ये तक्रार दाखल झाली म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात आला.

  अनुचित प्रकार टाळण्यासाठी कारवाई

  राज्य घटनेत कायद्याचे राज्य आहे असे म्हटले आहे. व्यक्तीपेक्षा कायदा मोठा आहे. त्यामुळे मी काही विशेष केले नाही, जे काही कायद्यात आहे. त्याची नियमानुसार अंमलबजावणी केली आहे. पोलिस विभाग हा कायद्याचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आहे. मी त्याचाच अवलंब करत आहे. पोलिस कारवाईचा हेतू एवढंच होता की, दोन संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या विषयानुसार भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी अटक करत होतो. पण त्यांनी न्यायालयात पुन्हा असे होणार नाही असे कोर्टात सांगितले आहे. विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांना खूप ज्ञान आहे माझं अल्प ज्ञान आहे; त्यानुसार मी कायद्याला धरून नोटीस काढली आहे. मंत्री महोदय २२६,२२७ खाली ते आदेश खारीज करू शकतात. मात्र, मी पण माझ्या आदेशावर ठाम आहे. मंत्रीमहोदयांना बोलावले आहे.

  आदेशावर ठाम

  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर बोलताना नाशिक पोलिस आयुक्त म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना कायद्याचे ज्ञान आहे. मात्र, माझ्या ज्ञानानुसार, ते आदेश चुकीचे असेल, तर ते आदेशाला आव्हान देऊ शकतात. माझे आदेश योग्य आहेत. मी माझ्या आदेशावर अजूनही ठाम आहे, असे आयुक्त म्हणाले.

  नारायण राणे यांना नाशिक पोलिसांकडून समन्स बजाविण्यात आला आहे. यानुसार त्यांना २ सप्टेंबरला नाशिक पोलिसांत हजर राहून तपासासाठी सहकार्य करण्यास सांगितले आहे. त्याबाबत नारायण राणे यांनी सहमती दर्शवली असून ते हजर राहणार आहेत.