भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा गोंधळ ; शासनाच्या सिंचन विहिरीच्या लाभापासून बागलाणची तब्बल १६८ गावे वंचित

नितीन बोरसे , सटाणा : गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मग्रारोहयो अंतर्गत सिंचन विहिरी निर्माण केल्या जातात यंदा मात्र भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या हवाल्याने तीन वर्षांपासून चांगला पावसाळा असतांनादेखील जिल्हा परिषदेने बागलाणमधील १७१ गावांपैकी फक्त चारच गावे सुरक्षित झोनमध्ये टाकून त्याच गावांना वैयक्तिक विहिरीचा लाभ देण्याबाबतचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे चारही गावे तीन वर्षांपूर्वी टंकरग्रस्त असल्यामुळे ते अचानक अतिशोषित झोनमधून सुरक्षित झोनमध्ये आल्याने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

बागलाणची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. आजही सुमारे पस्तीस टक्के गोरगरीब अल्पभूधारक शेतकरी विहीर नसल्यामुळे पावसाच्या भरवशावर शेती व्यवसाय करत आहे. शासनाने अशा शेतकऱ्यांच्या विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ दिला जातो. यंदा मात्र त्याला वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने त्याला खोडा घातला आहे. गेल्या तीन वर्षांपासून बागलाण तालुक्यात पावसाळा चांगला झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. असे असतांना भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मात्र तब्बल ५२ गावांना क्रिटिकल (शोषित ) झोनमध्ये तर ११५ गावांना सेमी क्रिटिकल (अंशतः शोषित) झोन मध्ये समावेश केल्याने एकही शेतकऱ्याला वैयक्तिक विहिरीचा लाभ घेता येणार नाही. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) रवींद्र परदेशी यांनी नवीन सिंचन विहीर घेतांना भूजल मूल्यांकन २०१७ नुसार दिलेल्या वर्गवारीनुसार विहिरीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत .या आदेशामुळे वैयक्तिक लाभाचे सादर केलेले प्रकरणे आता गुंडाळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

-टंचाईग्रस्त गावे सेफ झोनमध्ये
बागलाण तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात चक्क चारही गावे सेफ झोन मध्ये टाकले आहेत .यंत्रणेने केलेल्या या सर्वेक्षणबाबत संशय व्यक्त केला जात आहे.सेफ झोन मधील गावांमध्ये मानूर, राहूड, महड, चिराई या गावांचा समावेश आहे.दरम्यान बागलाण सोबतच निफाड, सिन्नर, येवला येथेही तोच गोंधळ असल्याचे समोर आले आहे.

-फेर सर्वेक्षण करा 
नाशिकच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सदोष सर्वेक्षणाच्या पाश्वर्भूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी थेट रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.चांगला पावसाळा व भूजलपातळी वाढली असतांना देखील चुकीच्या सर्वेक्षणमुळे शेकडो गरीब शेतकरी शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत सिंचन विहिरीच्या वैयक्तिक लाभापासून वंचित राहणार आहेत .तो शेतकर्यांवर एकप्रकारे अन्याय असून याबाबत आपल्या स्तरावर फेरसर्वेक्षण करण्याचे आदर्श व्हावेत, अशी मागणी आमदार बोरसे यांनी केली आहे.