माझ्या अंत्यविधीसाठी कुणालाही बोलवू नका; कापशीच्या ग्रामस्थांचा आदर्श

    देवळा : प्रतिष्ठेसाठी विवाह, अंत्यविधी व दशक्रिया विधीला होणारी गर्दी कोरोणाच्या उद्रेकाला जबाबदार असूनही गर्दी कमी होतांना दिसत नाही. मात्र मृत्यूच्या दारात असलेली व्यक्ती मुलाजवळ कुणालाही माझ्या अंत्यविधीला बोलावू नका अशी अंतिम इच्छा व्यक्त करते. मुलेही नातेबाईक आणि भाऊबंदकीचा रोष पत्करून वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करतात व समाजापुढे नवा आदर्श निर्माण करतात.

    दरम्यान कापशी येथील रहिवासी व जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक दिनकर चिंधु भदाणे पाटील (८१) यांना २२ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी यांच्याजवळ त्यांचे जेष्ठ पुत्र चंद्रशेखर हे होते. त्यावेळी दिनकरराव यांना परिस्थिती कळून चुकली होती. त्यांच्यावर तात्काळ उपचारासाठी चंद्रशेखर धावपळ करत असतांना त्यांनी सर्वांना जवळ बोलावून सांगितले की, आता काही माझे खरे नाही, देशभरात कोरोना हाहाकार माजवत आहे. आपला नात्यागोत्याचा परिवार मोठा आहे. अशा परिस्थितीत कुणालाही माझ्या अंत्यविधीला बोलावू नका, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा, तुम्ही तिघे भावंडे मिळून माझा अंत्यसंस्कार तसेच पुढचे सर्व विधी करा, गर्दी होऊ देऊ नका असे म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला.

    तसेचं त्यांना कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी नव्हती तसेच सेवनिवृत्तीनंतर त्यांनी संपूर्ण जीवन पुस्तके वाचून व्यतीत केले. मृत्यूसमयी आपल्यामुळे कुणालाही त्रास व्हायला नको या सामाजिक जाणिवेतून आपली अंतिम इच्छा मुलांजवळ व्यक्त करून एक आदर्श पायंडा निर्माण केला. त्यांच्या इच्छेचा मान राखून त्यांची मुले चंद्रशेखर, सुनील आणि रमेश यांनी सर्व नातेबाईकांना दूरध्वनी द्वारे माहिती देऊन कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेता अंत्यसंस्कार तसेच मृत्यूपश्चात सांत्वनासाठी दारावर येणे व पुढील होणाऱ्या धार्मिक विधींसाठी कुणीही येऊ नये अशी विनंती केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी समाजात अशा निर्णयांची गरज असून त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

    अंत्यविधीला होणारी गर्दी हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. आजच्या परिस्थितीत ही मनोवृत्ती बदलली पाहिजे. सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी कुणाचाही जीव धोक्यात घालू नका ही वडिलांची अंतिम इच्छा होती. असं चंद्रशेखर भदाणे म्हणाले