Due to torrential rains, Nashik's seepage lake burst and ...

मंगळवार दुपारपासून नांदगाव शहर आणि तालुक्यात पावसाची संततधार सुरु असून चोवीस तासात नांदगाव महसूल मंडळात 123 मिमी पाऊस झाला असून, इतर महसूल मंडळात देखील अतिवृष्टी झाली आहे. साकोरा जवळ पाझर तलाव फुटल्यामुळे अनेक शेतात पाणी शिरले. लेंडी आणि शाकंबरी नद्यांना पूर येऊन त्यात अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी जनावरे दगावली सर्व तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  नांदगाव : मुसळधार पावसाने नांदगाव शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात हाहाःकार माजविला असून, सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी लेंडी आणि शाकंबरी या दोन्ही नद्यांना महापूर आले होते. दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केल्यामुळे पुराचे पाणी शहरातील विविध वस्त्यांसोबत मुख्य बाजारपेठेत शिरले. त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. दुकानात पाणी गेले तर काही छोट्या टपऱ्या पाण्यात वाहून गेल्या त्यामुळे मोठे नुकसान झाले. रेल्वे ट्रॅकवरदेखील तीन फुटांपर्यंत पाणी साचले हाेते.

  2011 नंतर माेठा पूर

  मंगळावरी  झालेल्या पावसामुळे तालुक्यातील इतर भागालादेखील मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली तर पाझर तलाव फुटल्यामुळे त्याचे पाणी अनेक शेतात शिरले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काल शहरात १२३ मीमी पावसाची नाेंद झाली. प्रथमच पुराचे पाणी रेल्वेस्थानकात शिरले होते. रेल्वे ट्रकवर तर तब्बल 3 फुटापर्यंत पाणी साचून त्याला पाटाचे स्वरूप आले होते. रेल्वे गेट बंद करून नव्याने तयार करण्यात आलेल्या अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरला होता त्यामुळे गावाचे दोन भाग होऊन त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. 2011 नंतर नांदगाव शहर आणि तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून नागरिक, व्यापारी, दुकानदार, गोरगरीब, शेतकरी, ग्रामस्थ यांचे मोठे नुकसान झाले आहे.

  शासनाने तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी नुकसानग्रस्तांनी केली. दरम्यान आमदार सुहास अण्णा कांदे यांना मतदारसंघात अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळताच त्यांनी मुंबईचा दौरा अर्धवट सोडून तातडीने नांदगावला धाव घेऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. नगराध्यक्ष बबी काका कवडे यांनी देखील पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.

  १२३ मीमी पावसाची नाेंद

  वेधशाळेने दिलेला अतिवृष्टीचा इशारा खरा ठरला असून नांदगाव शहर परिसरासह तालुक्यात सोमवार रात्री पासून पावसाने हजेरी लावली होती. सुरुवातीला पावसाची रिपरिप सुरु झाली. अधूनमधून जोरदार पाऊस होत होता मात्र मंगळवार दुपारपासून पावसाचा जोर वाढला आणि पाहता पाहता मुसळधार पाऊस झाला. चोवीस तासात तब्बल 123 मिमी इतका पाऊस झाल्यामुळे शहराच्या मध्यभागातून वाहणारी लेंडी आणि शाकंबरी या दोन्ही नद्यांना पूर नव्हे तर महापूर आले. नदीलगत शहराची मुख्य बाजार पेठ असून अनेक वसाहती देखील आहेत पुराचे पाणी घरात, दुकानात शिरले. रात्रीची वेळ असल्यामुळे नागरिकांचा एकच गोंधळ उडाला एकीकडे सुरु असलेला मुसळधार पाऊस तर दुसरीकडे नद्यांनी धारण केलेला रौद्ररूप पाहून नागरिक भयभीत झाले आणि त्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेवून जीव वाचवला.

  रेल्वे वाहतूक ठप्प

  अतिवृष्टी आणि पुराचा सर्वात जास्त फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, म. गांधी चौक, मटन मार्केट, भाजी मार्केट, मस्तानी अम्मा दरगाह परिसर, गुलजारवाडी यांसह इतर भागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली तर अनेक दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापारी,दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. तिकडे ग्रामीण भागात देखील मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी जनावरे दगावली तर दोन ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे त्याचे पाणी अनेक शेतात शिरले त्यामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले.

  रेल्वेच्या इतिहासात प्रथमच रेल्वे स्थानकात पाणी शिरून रेल्वे रुळावर सुमारे तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते.रुळावर पाणी साचल्यामुळे काही गाड्या मनमाड तर काही गाड्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. पाणी सकाळी पाणी ओसरल्यानंतर धिम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली.

  मंगळवार दुपारपासून नांदगाव शहर आणि तालुक्यात पावसाची संततधार सुरु असून चोवीस तासात नांदगाव महसूल मंडळात 123 मिमी पाऊस झाला असून, इतर महसूल मंडळात देखील अतिवृष्टी झाली आहे. साकोरा जवळ पाझर तलाव फुटल्यामुळे अनेक शेतात पाणी शिरले. लेंडी आणि शाकंबरी नद्यांना पूर येऊन त्यात अनेक घरे, दुकानांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी जनावरे दगावली सर्व तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासकीय यंत्रणा सतर्क व सज्ज असून नागरिकांनी देखील सतर्क रहावे.

  - दीपक पाटील, तहसीलदार, नांदगाव