पालकमंत्री भुजबळ यांचे प्रयत्न: साैर उर्जेवर चालणार पाणीपुरवठा याेजना; ४५ लाखांची हाेणार बचत

सौर ऊर्जेमुळे दरमहा असलेला लाईट बिलाचा भार कमी होणार आहे. या योजनेस दरवर्षाला किमान ४५ लाखापेक्षा अधिक वीज बिल भरावे लागत आहे सौर ऊर्जेवर कार्यान्वित होणारी ही पथदर्शी अशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठरणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने पुढील वर्षभरात ही योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर होऊन विजेची पूर्ण बचत होणार आहे.

    येवला : संपूर्ण देशासाठी रोड मॉडेल ठरलेल्या येवला तालुक्यातील ३८ गांव पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पास राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून १ कोटी ६६ लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प १ वर्षात पूर्ण होणार असून, येवला ३८ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलाचा यक्ष प्रश्न त्यामुळे कायमस्वरूपी निकाली निघून ही योजना राज्यभरातील पाणीपुरवठा योजनांसाठी रोल मॉडेल ठरणार आहे.

    पाणीपुरवठा याेजना राज्यात अव्वल
    पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे सुरु आहे.या योजनेला ३८ गावांव्यतिरिक्त आणखी २१ गावे जोडल्यामुळे तालुक्यातील ५९ गावांसाठी ही योजना जलसंजीवनी ठरली आहे. ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देशामध्ये अव्वल ठरली असून देशातील सर्वोकृष्ट योजना म्हणून हैद्राबाद येथे या योजनेचा यापूर्वीच गौरव करण्यात आला आहे. रोल मॉडेल असलेली ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्याचे छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.

    विजेची हाेणार बचत
    सौर ऊर्जेमुळे दरमहा असलेला लाईट बिलाचा भार कमी होणार आहे. या योजनेस दरवर्षाला किमान ४५ लाखापेक्षा अधिक वीज बिल भरावे लागत आहे सौर ऊर्जेवर कार्यान्वित होणारी ही पथदर्शी अशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठरणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने पुढील वर्षभरात ही योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर होऊन विजेची पूर्ण बचत होणार आहे. यामुळे जवळपास ५९ गावांना पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीतपणे होऊन नागरिकांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे. या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष मोहन शेलार आणि उपाध्यक्ष सचिन कळमकर हे सदर योजना यशस्वीपणे राबवत आहे.