ट्रकसह आठ लाखांचा ऐवज जप्त ; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला गोमांसाचा ट्रक

ट्रकमध्ये असलेल्या जनावरांच्या मांसाबाबत चालकाकडे पशुवैद्यकीय अधिकार्‍याचा दाखला, तसेच संबंधित प्राधिकृत अधिकार्‍याचा दाखला अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने आढळून आले नाहीत. ही बाब लक्षात घेता अंबड पोलिसांनी एमएच १४ एयू १९०२ या क्रमांकाचा पाच लाख रुपयांचा ट्रक, तसेच साडेतीन लाख रुपयांचे जनावरांचे मांस असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

    सिडकाे : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील स्प्लेंडर हॉलसमोर गोमांसाचा ट्रक पकडून तो अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला. अंबड पोलिसांनी ट्रकसह गोमांस असा ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या घटनेची अंबड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की बजरंग दलाचे गोरक्षाप्रमुख पुरुषोत्तम दगू आव्हाड (३०, रा. मोरवाडी, सिडको) हे व बजरंग दलामध्ये काम करणारे चंदन भास्करे, तेजस मोरे व अनिकेत कुमावत यांना मालेगाव येथून एमएच १४ एयू १९०२ या क्रमांकाच्या ट्रकमधून विनापरवाना जनावरांचे, तसेच गोमांस घेऊन मुंबई येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील स्प्लेंडर हॉलसमोर ट्रक थांबविला.

    यांना घेतले ताब्यात
    या ट्रकमधील चालकासोबत तीन व्यक्ती बसल्या होत्या. या ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे तुकडे केलेले आढळून आले. हा ट्रक अंबड पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याबाबत चालकास सांगितले असता त्याने तो ट्रक पोलीस ठाण्यात आणला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी ट्रकचालक माजिदखान शाहीदखान (२६, रा. जाफरनगर) व त्याचे साथीदार क्लिनर शेख जावेद शेख दाऊद (३०, रा. देवकी मळा, मालेगाव), तसेच हेल्पर शेख फिरोज शेख रहमान (३४, रा. मोमिनपुरा, मालेगाव) यांच्याकडे विचारपूस केली असता ट्रकमध्ये बर्फासहित मांसाचे तुकडे व रक्तमिश्रित पाणी झिरपताना दिसून आले.

    पोलिसांत गुन्हा दाखल
    या ट्रकमध्ये असलेल्या जनावरांच्या मांसाबाबत चालकाकडे पशुवैद्यकीय अधिकार्‍याचा दाखला, तसेच संबंधित प्राधिकृत अधिकार्‍याचा दाखला अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने आढळून आले नाहीत. ही बाब लक्षात घेता अंबड पोलिसांनी एमएच १४ एयू १९०२ या क्रमांकाचा पाच लाख रुपयांचा ट्रक, तसेच साडेतीन लाख रुपयांचे जनावरांचे मांस असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.