चिंचावड येथे विनापरवानगी छत्रपतींच्या पुतळ्याची स्थापना

तालुक्यातील चिंचावड येथे विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. याबाबत माहती मिळताच तहसिलदार चंद्रजीत राजपूत व तालुका पोलिसांनी चिंचावड गाठून ग्रामस्थांना पुतळा काढण्याबाबत सुचना केली. मात्र दोन दिवस उलटूनही पुतळा काढला न गेल्याने सोमवार दि.२२ रोजी पोलीस बंदोबस्तात विधीवत पूजा करून पुतळा हलविण्यात आला.

    मालेगाव : तालुक्यातील चिंचावड येथे विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. याबाबत माहती मिळताच तहसिलदार चंद्रजीत राजपूत व तालुका पोलिसांनी चिंचावड गाठून ग्रामस्थांना पुतळा काढण्याबाबत सुचना केली. मात्र दोन दिवस उलटूनही पुतळा काढला न गेल्याने सोमवार दि.२२ रोजी पोलीस बंदोबस्तात विधीवत पूजा करून पुतळा हलविण्यात आला.

    अलीकडेच कळवाडी येथे देखील रातोरात अशाच प्रकारे शिवरायांचा पुतळा उभारण्याची घटना घडली होती. चिंचावड गावात देखील मध्यवर्ती चौकात असलेल्या सभामंडपात शनिवार दि. २० अज्ञात व्यक्तींकडून हा पुतळा उभारून त्या बाजूला बांधकाम करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने याची दखल घेत तहसिलदार राजपूत यांचेशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार व पोलीस प्रशासनाने दि.२० व २१ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांची बैठक घेत शासनाच्या नियमावलीनुसार पुतळा उभारणीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याची कल्पना देत पुतळा काढून घेण्याविषयी आवाहन केले होते. मात्र दोन दिवस उलटूनही पुतळा काढला न गेल्याने अखेर सोमवार दि.२२ रोजी दुपारी तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस उपाधिक्षक शशिकांत शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.के.ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेत विधिवत पूजा करून तो पुतळा हलविण्यात येऊन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान काही जणांकडून यास विरोध झाल्याने अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात येऊन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. या घटनेने गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी अज्ञात चार ते पाच जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी दिली.