कांदा दरात माेठी घसरण; व्यापाऱ्यांचा लिलावास नकार

लासलगाव : आयकर विभागाने लासलगाव बाजार समितीतील नऊ तर पिंपळगाव बाजार समिती एका कांदा व्यापार्‍यावर छापे मारल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा व्यापाऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावात सहभागी न होण्याच्या निर्णयामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत.

लासलगाव : आयकर विभागाने लासलगाव बाजार समितीतील नऊ तर पिंपळगाव बाजार समिती एका कांदा व्यापार्‍यावर छापे मारल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा व्यापाऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावात सहभागी न होण्याच्या निर्णयामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. कांदा लिलावासाठी आणलेला कांदा परत नेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. कांद्याचे लिलाव त्वरित सुरू न झाल्यास शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने रस्तारोको, रेलरोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेलराेकाेचा इशारा
शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी लासलगाव बाजार समितीने प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन सभापती सुवर्णा जगताप यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे टाकल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद केली असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे कांदा बाजारभाव कमी होऊन अतोनात नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. शिवाय साठवणूक केलेला कांदा दिवसेंदिवस खराब होत असल्याने हे मोठे संकट आधीच शेतकऱ्यांपुढे आलेले आहे. कांदा व्यापाऱ्यांनी तातडीने लिलाव सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचा रास्ता रोको, रेल रोकोसारखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हंसराज वडघुले यांनी दिला आहे.

शेतकऱ्यावर दुहेरी संकट
यंदाच्या पावसाळी हंगामात जास्त दिवस पावसाचा झालेला मुक्काम व दमट हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला तर अतिवृष्टीमुळे नवीन लाल कांद्याचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीत साठवलेल्या कांद्याची मागणी देशांतर्गत वाढल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजार भावाने तीन हजार रुपयांचा टप्पा पार करताच केंद्र सरकारने 14 सप्टेंबर रोजी पूर्वसूचना न देता कांद्याची निर्यात बंदी केली गेली. बुधवारी लासलगाव बाजार समितीत चार हजार आठशे रुपये इतका उच्चांकी बाजार भाव मिळताच दुसऱ्या टप्प्यात 14 ऑक्टोंबर रोजी लासलगाव, पिंपळगाव येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे मारले गेले.

कांदा व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने याचा थेट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झाला. कुठेतरी कांद्याच्या बाजार भावातून दिलासा मिळत असताना या झालेल्या कारवाईमुळे कांद्याचे बाजार भाव कोसळणार तर नाही ना अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आज लासलगाव बाजार समितीत आणलेला कांदा हा परत नेण्याची नामुष्की शेतकऱ्यांना वाहतुकीचाही खर्च भरावा लागणार आहे, असं नानासाहेब बच्छाव यांनी सांगितले. कांद्याचे लिलाव हे त्वरित सुरू झाले पाहिजे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे.

लासलगाव बाजार समिती कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे मारल्याने कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. लवकरच बाजार समिती प्रशासन व कांदा व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेऊन हे लिलाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

“येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.मागील वर्षी कांद्याला ११ हजार रु प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला होता परंतु या वर्षी तशी परिस्थिती नाही,आता ४५०० रु प्रति क्विंटल असा भाव मिळत असतांना देखील आयकर विभागाकडून कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून बाजार भाव नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.नैसर्गिक रित्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही कांद्याला बाजारभाव मिळत आहे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
– जयदत्त होळकर  संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती