वीज जोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, विरु स्टाईल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची अधिकाऱ्यांनी काढली समजूत

चांदवड तालुक्यातील थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची नोटीस न बजवता वीज तोडणी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी चांदवड शहरातील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यलयाच्या छतावर चढून तोडलेली वीज जोडणी तत्काळ जोडा, अन्यथा अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

    चांदवड : चांदवड तालुक्यातील थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची नोटीस न बजवता वीज तोडणी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी चांदवड शहरातील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यलयाच्या छतावर चढून तोडलेली वीज जोडणी तत्काळ जोडा, अन्यथा अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

    यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्य घबराट निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पिकांना पाणी भरणे आवश्यक असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत.महाविरणने कोणत्याही प्रकारच्या नोटिसा न बजावता शुक्रवारी (ता.१२) तालुक्यातील दिघवद, दहीवद, पाटे, काजीसांगवी आदी गावातील वीज जोडण्या तोडलल्या. यामुळे संतप्त झालेले गणेश निंबाळकर, रेवन गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, बाळनाथ आहेर, अनिल शेळके, सोपान शेळके, वैभव निंबाळकर, उत्तम खांदे, संजय ठोके, भावराव वागमोडे, गोविंद गांगुर्डे, गंगाधर गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे आदींसह शेतकऱ्यांनी सायंकाळी चांदवडमधील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाच्या छतावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

    छतावर चढलेल्या शेतकऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी उपकार्यकरी अभियंता रवींद्र आव्हाड आणि सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढूण्याचा प्रयत्न केला, रात्री ८.३० च्या सुमारास वीज वितरण कंपनीचे अधिकारी आव्हाड यांनी तोडलेली वीज जोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

    सध्या आंदोलन मागे घेतले असले, तरी दिलेल्या आश्वासनानुसार वीजजोडणी न केल्यास पुन्हा आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.