धक्कादायक ! दोन लहान मुलांसह वडिलाची आत्महत्या

जुने नाशिक (वा.) सय्यद पिंप्री परिसरातील दगडी खाणीत मंगळवारी (दि.7) दुपारी तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

    नाशिक : जुने नाशिक (वा.) सय्यद पिंप्री परिसरातील दगडी खाणीत मंगळवारी (दि.7) दुपारी तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दोन लहान मुलांसह शंकर महाजन (३४), पृथ्वी शंकर महाजन (३), प्रगती शंकर महाजन (३) यांचा मृतदेह आढळून आला असून, खाणीतून तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. खाणीजवळ असलेल्या खड्ड्यात असलेल्या पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आले.

    दरम्यान, हे मृतदेह दगड खाणीतील मजुरांचे नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर नाशिक तालुका पोलिसांनी केलेल्या तपासात मृत हे ओझर येथील‌ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता ही व्यक्ती ओझरचीच असून, आपल्या मुलांसह दगडाच्या खाणीजवळ जाऊन त्याने आत्महत्या केली. बैलपाेळ्याचा सण साजरा केल्यानंतर हा इसम या दगडी खाणीकडे गेल्याचे समजते.

    नाशिक तालुका पोलिसांना घटनास्थळावर मृतांची ओळख पटविण्यात यश आले असले तरी आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नाशिक तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विजय कोठावदे हे पुढील तपास करत आहेत. घटनास्थळावरुन तिघांचे मृतदेह हलवून ते शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.