जिजामाता उद्यान बांधकामात आर्थिक भ्रष्टाचार

-चौकशीची माजी नगरसेवक पगारे यांची मागणी

मालेगाव : येथील महापालिका हद्दीतील सोयगाव भागातील स.न. ४८ मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या जिजामाता उद्यानात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक गुलाब पगारे यांनी केली आहे.

सोयगाव भागात बांधण्यात आलेल्या या उद्यानासाठी २ कोटी १५ हजार रुपये प्राकलन रक्कम ठरली असताना देखील या उद्यानावर २ कोटी ३० लाख ५ हजार खर्च करण्यात आला आहे. प्राकलन रकमेपेक्षा ७ टक्के जास्त रकमेचे निविदा का काढण्यात आली? असा प्रश्न पगारे यांनी उपस्थित केला आहे.
सदर उद्यान बांधकामावेळी शहर अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे असताना देखील त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. याउलट भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निवेदनात म्हटले आहे. उद्यान असलेली जागा खड्ड्यात असल्याने यासाठी ३० ते ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असताना सदर रक्कम खिशात घालून त्यात भर न टाकताच उद्यान खड्ड्यात बांधले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याने सदर उद्यान नेस्तनाबूत झाले आहे.

सदर उद्यानात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच उद्यानाचे निकृष्ट बांधकाम केल्याप्रकरणी मक्तेदार नामदेव दौलत भगत यांनी काळया यादीत टाकावे, अशी मागणी पगारे यांनी मनपा आयुक्त यांचे कडे केली आहे. आठ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील पगारे यांनी दिला आहे.