गॅस सिलिंडर बदलताना भडका; दोन महिलांचा मृत्यू तर सहा जण जखमी

सय्यद कुटुंबीयांच्या घरातील सिलिंडर संपले होते. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून आणलेला सिलिंडर मध्यरात्री बदलत होते. रेग्युलेटर लावताना गॅस गळती झाली. गळतीमुळे आग भडकेल म्हणून घरातील पुरुषांनी पाण्याने भरलेल्या पिंपात सिलिंडर ठेवून दिला होता. यावेळी घरभर पसरलेल्या गॅसने पेट घेतला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला.

    नाशिक : घरगुती गॅस सिलिंडर बदलताना उडालेल्या भडक्यात गंभीररित्या भाजलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले. वडाळा नाका परिसरातील संजरीनगर अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. रेग्युलेटर बदलताना गॅस गळती झाल्याने आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नसरीन नुसरद सय्यद (25) आणि सईदा शरफोद्दीन सय्यद (49) असे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सय्यद नुसरत रहीम (25), शोएब वलिऊल्ला अन्सारी (28), मुस्कान वलिऊल्ला सय्यद (25), आरिफ सलिम अत्तार (53), सय्यद लियाकत रहीम (32) आणि रमजान वलिऊल्ला अन्सारी (22) आदी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, संजरीनगर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 7 मध्ये राहणाऱ्या सय्यद कुटुंबीयांच्या घरातील सिलिंडर संपले होते. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडून आणलेला सिलिंडर मध्यरात्री बदलत होते. रेग्युलेटर लावताना गॅस गळती झाली. गळतीमुळे आग भडकेल म्हणून घरातील पुरुषांनी पाण्याने भरलेल्या पिंपात सिलिंडर ठेवून दिला होता. यावेळी घरभर पसरलेल्या गॅसने पेट घेतला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला.

    अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्वरित धाव घेत घरातील महिला व मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. एका टॅम्पोतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.