… अन् गंगेला आला महापूर ; ढिसाळ नियाेेजनाचे ‘माॅकड्रील’

मॉकड्रीलसाठी गोदाकाठाच्या भागाकडे येणारे रस्ते बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, हे करताना महापूराच्या परिस्थिती गोदापात्राच्या किती भागात पाणी पोहचू शकेल याचा विचार करून पात्राच्या भागात पार्क केलेली वाहने काढण्याची काळजी घेणे गरजेचे असताना ते वाहने तशीच पार्क केलेली होती. रामकुंड. रोकडोबा मैदान, कपुरथळा, यशवंतराव महाराज पटांगण येथे वाहने उभी होती. पूर परिस्थितीत अशी वाहने उभी असल्यास ती वाहून जातील यांचा विचार मॉकड्रीलच्या वेळी करण्यात आला नाही.

  नाशिक : पावसाळा सुरू झाला आहे. धरणकाठच्या गावात जाेरदार पर्जन्यवृष्टीदेखील झाली आहे. येत्या काही दिवसांत अशीच पर्जन्यवृष्टी हाेत राहिली तर गंगापूर धरणाचे दरवाजे उघडले जातील आणि गाेदेला महापूर येऊ शकताे. अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कसे व्यवस्थापन करायचे? याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी गाेदाघाट परिसरात ‘माॅकड्रील’ करण्यात आले. मात्र या माॅकड्रिलदरम्यान कुठल्याही यंत्रणेला याचे गांभीर्य नव्हते. नियाेजनही अत्यंतढिसाळ हाेते, त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाचे सध्याच्या काळातील पहिलेच माॅकड्रील ‘फेल’ गेले.

  केविलवाणे प्रात्यक्षिक
  गंगापूर धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणातून तब्बल एक लाख क्युसेस पाण्याची विसर्ग केला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा आपत्ती व्यवस्थापन विभागाला ११ बाजून २६ मिनिटांनी फोन येतो. तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रशांत वाघमारे हे तातडीने जिल्हाधिकारी आणि इतर सर्व विभागांना सूचना दिल्या जातात आणि आपत्ती निवारणाची प्रक्रिया सुरु होते. धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर काय करायचे, याचा लघुकृती आराखडा करण्यात आला आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर शहरापर्यंत पोहचण्याची पाण्याची वेळ व त्यानुसार विविध यंत्रणा कशाप्रकारे काम करील याचे प्रात्याक्षिक यावेळी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.

  वाहने पार्किंगमध्येच!
  या मॉकड्रीलसाठी गोदाकाठाच्या भागाकडे येणारे रस्ते बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, हे करताना महापूराच्या परिस्थिती गोदापात्राच्या किती भागात पाणी पोहचू शकेल याचा विचार करून पात्राच्या भागात पार्क केलेली वाहने काढण्याची काळजी घेणे गरजेचे असताना ते वाहने तशीच पार्क केलेली होती. रामकुंड. रोकडोबा मैदान, कपुरथळा, यशवंतराव महाराज पटांगण येथे वाहने उभी होती. पूर परिस्थितीत अशी वाहने उभी असल्यास ती वाहून जातील यांचा विचार मॉकड्रीलच्या वेळी करण्यात आला नाही.

  रुग्णवािहका पाेहाेेचली उशीरा
  आपत्कालीन शोध व बचाव पथक बोट, लाईफ जॅकेट, लॅम्प, कटर, स्ट्रेचर आदी साहित्य घेऊन हजर होते. मुख्य अग्निशामक, पंचवटी अग्निशामक, शहर वाहतूक शाखा पोलिस, रुग्णवाहिका, आरोग्य विभाग आदींनी यात सहभाग घेतला. रुग्णवाहिका मॉकड्रीलच्या जागेकडे येत असताना गंगाघाटावरील रस्त्यात काम सुरु असल्याने वाहनांना ये-जा करण्यास अडचणी येतात. त्यात रुग्णवाहिका अडकून पडल्याने त्यांना येण्यास उशीर झाला होता.

  अग्निशमनकडे विचारणा
  रामकुंड परिसरात जागा कमी असल्यामुळे मॉकड्रीलसाठी म्हसोबा पटांगणावरची मोकळी जागा निवडण्यात आली. त्या भागाकडे येणारे मार्ग बंद करण्यात आले. जेव्हा अग्निशामक दलाच्या वाहनातून एक लाख क्युसेस पाणी सोडण्याचा सूचना देत गोदाकाठच्या रहिवाशांनी व व्यावसायिकांनी सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे सुरु केल्यानंतर ऊन पडलेले, पाऊस नसताना धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कसे सोडले याचा नागरिकांना प्रश्न पडला होता. काही नागरिकांनी ही शंकाही अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी विचारली.

  यांची  उपस्थिती
  सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत या मॉकड्रीलचा समारोप करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन आपत्ती निवारणाची प्रक्रिया राबवावी लागते. तशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. भुषण सांळुके आदी उपस्थित होते.