गॅस सिलिंडर वाहतूक आजपासून सुरळीत

मनमाड : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला इंडियन ऑइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील गॅस सिलिंडर वाहतूकदारांचा संप मिटला असून आज (मंगळवार) पासून राज्यातील विविध भागात गॅस सिलिंडर पुरवठा सुरु झाला आहे. खासदार डॉ. भारती पवार यांनी मध्यस्थी करून तोडगा काढल्यामुळे वाहतूकदारांनी संप मागे घेतला. याकामी आमदार सुहास कांदे यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली असून, कंपनीच्या अधिकाऱ्यानी वाहतूकदारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची माहिती वाहतूकदार संघटनेचे नाना पाटील यांनी दिली.

मनमाड पासून ७ किमी अंतरावर पानेवाडी-धोटाणे परिसरात इंडियन ऑइल कंपनीचा गॅस प्रकल्प आहे. या प्रकल्पातून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत सुमारे ५५ ट्रकच्या माध्यमातून गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो एका ट्रक ३५०सिलिंडर असतात त्यामुळे या प्रकल्पातून रोज १८ हजार ५०० सिलिंडर पुरवठा होतो.सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी कंपनीकडून निविदा मागवली जाते. शहर परिसरातील वाहतूकदार गेल्या अनेक वर्षांपासून गॅस सिलिंडर वाहतूक करण्याचे काम करीत आहे. मात्र प्रकल्पातील काही अधिकारी मनमानी कारभार करून अपमानास्पद वागणूक देत असतात तसेच स्थानिकऐवजी बाहेरच्या वाहतूकदारांना सिलिंडर वाहतूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा आरोप करत स्थानिक वाहतूकदारांनी शनिवारी पासून संप पुकारला होता. या संपामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात केला जाणारा गॅस सिलिंडर पुरवठा ठप्प झाला होता. अखेर खासदार डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थित कंपनीचे अधिकारी आणि वाहतूकदार यांची संयुक्त बैठक झाली. त्यात सन्मान जनक तोडगा निघाल्यानंतर वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. या बैठकीत नाना पाटील, संजय पांडे, कांती लुणावात, संजय चोपडा यांच्यासह इतर वाहतूकदार व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.