शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध : अजित पवार

आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात ३०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे.

    नाशिक : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देवून शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच वारसा घेवून शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा व त्यांची फसवणूक होणार नाही यादृष्टिने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

    देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा भुमिपुजन शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सरोज अहिरे, दिलीप काका बनकर, नितीन पवार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, सय्यद पिंपरी गावचे सरपंच मधुकर ढिकले यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास जलद गतीने विकास होण्यास मदत होईल. याकरिता सर्वांनी जातीने लक्ष दिल्यास कामाची गुणवत्ता टीकून राहण्यास मदत होईल. आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या जिद्द व चिकाटीने आपल्या विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून देवळीली विधानसभा मतदारसंघ येथील प्रस्तावित असलेल्या १५ कोटींच्या क्रिडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटी निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार असून, क्रिडा संकुलाचे काम सुरु झाल्यानंतर उर्वरीत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

    आरोग्य विभागात कोरोना काळात निधीची कमतरता पडू नये यासाठी अधिवेशनात ३०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग या विभागांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशात सर्वात जास्त लसीकरण राज्यात झाले आहे. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हाफकीन या संस्थेला लस निर्मितीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी कोरोना काळात रुग्णांची अथक सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी व डॉक्टरांना डॉक्टर दिना निमित्त शुभेच्छा देवून, सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व तिसऱ्या लाटेत स्वत:सोबत आपल्या कुटुंबाची व बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.