ओबीसीविषयी विराेधकांच्या मनात तिरस्कार : जयंत पाटील

आपल्याला पक्ष म्हणून आपल्या लोकांपर्यंत पोहोचावेच लागेल. त्यासाठी आपल्याला आपली संघटना सक्षम करावी लागेल. सैन्य नसेल तर लढणार कसे? त्यामुळे हे सैन्य उभे करावे. हीच लोकं आपल्या विजयाची शिल्पकार ठरणार आहेत. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळांनी मोठा पाठपुरावा केला आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवून ठेवले.

  नांदगाव : शहरातून जाणारा फाटक बंद करून रेल्वे प्रशासनाने बांधलेल्या अंडरपासची डिजाईन चुकली असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेते नाशिक जिल्ह्ययाच्या दौऱ्यावर असून त्याअंतर्गत त्यांनी नांदगावला भेट देऊन पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

  संपर्क वाढवा
  ते पुढे म्हणाले की अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यासह राज्यात अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध बद्ध आहे. नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यात बोलताना ते म्हणाले की, नांदगाव विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपयश आले. मात्र आपला पक्ष जर मजबूत असेल तर असे अनेक पराभव पचवून आपण पुन्हा उठून उभं राहू शकतो. लोकांशी संपर्क साधा पराभवाच्या कारणांची मिमांसा करा. आज आपण सत्तेत आहोत. या सत्तेचा उपयोग लोकांची मदत करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी नांदगाव येथे केले.

  ओबीसींचा तिरस्कार
  आपल्याला पक्ष म्हणून आपल्या लोकांपर्यंत पोहोचावेच लागेल. त्यासाठी आपल्याला आपली संघटना सक्षम करावी लागेल. सैन्य नसेल तर लढणार कसे? त्यामुळे हे सैन्य उभे करावे. हीच लोकं आपल्या विजयाची शिल्पकार ठरणार आहेत. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळांनी मोठा पाठपुरावा केला आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवून ठेवले. ओबीसी समाजाबद्दल भाजपला तिरस्कार म्हणून ओबीसी आरक्षणात अडथळे निर्माण करण्यात आले.

  भाजपा ताेंडघशी
  त्याच तिरस्कारमुळे भुजबळांना तुरुंगात टाकण्याचे काम भाजपने केले. न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहात भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र विजय सत्याचा होत असतो म्हणून आज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली व भाजप तोंडघशी पडले आहे, असेही ते म्हणाले.

  मतदारांपर्यंत पाेहाेचा
  ओला दुष्काळाबरोबर शेतकऱ्यांना मदत मिळणे जास्त महत्वाचे आहे. सरकार सर्वांना मदत करणार आहे. त्या पध्दतीची पावले सरकारने टाकली आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. देशातले काही सोडायचं नाही सगळं विकायचं धोरण मोदीसरकारने राबवायला सुरुवात केली आहे. मोदी सरकार भांडवलदारांचे आहे. हे आता नक्की झाले आहे. हे सगळे मुद्दे
  मतदारापर्यंत पोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

  यांची उपस्थिती
  या संवाद यात्रेला पंकज भुजबळ, आसिफ शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बाळा कळंजी, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवती जिल्हाध्यक्षा ईश्वरी खैरनार, महिला तालुकाध्यक्षा योगिता पाटील, योगेश गोसावी, दिव्या भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.