ऐतिहासिक निर्णय : आता अमावस्येला हाेणारी लासलगावी कांद्याचे लिलाव

नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीची स्थापना करत शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे.

    उमेश पारिक , लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बदल करत अमावस्येच्या दिवशीही आता कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप आणि लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी दिली.

    शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली १ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत ७५ वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवण्याची ही परंपरा का आणि कशासाठी अवलंबली जात होती, याचे कोणाजवळ ही उत्तर नव्हते. मात्र परंपरेचे काटेकोरपणे पालन आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव बाजार समितीच्या प्रशासनाकडून केले जात होते. या प्रचलित परंपरेला आता फाटा देत दर अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहे. तसेच शनिवारी एका सत्रात सुरू असलेले कांद्याचे लिलाव ही दर शनिवारी दोन्ही सत्रात सुरू करण्यात आले.

    हे कारण बोलले जाते
    नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीची स्थापना करत शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आधुनिक वाहनांची उपलब्धता नसल्याने बैलगाड्यांमधून कांदा व धान्य विक्रीसाठी येत असे. महिन्याच्या दर अमावस्येला आपल्यावर काही विपदा येऊ नये, म्हणून व्यापारी, शेतकरी आणि हमाल मापारी हे बाजार समितीच्या आवारातील कांदा व धान्य लिलावाच्या कामकाजात सहभागी होत नसल्याने कांद्याचे व धान्य लिलाव बंद ठेवले जात असल्याचे बोलले जाते.