देवी दर्शनासाठी जाणाऱ्या आईवर मृत्यूचा घाला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या

तीन चिमुकल्या लेकी आणि मैत्रिणीसोबत नवरात्रोत्सामुळे देवीच्या दर्शनासाठी चालली होती. दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना, दोन रेल्वे एकाच वेळी पास झाल्या. त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे.

    नांदगाव (Nandgaon) : रविवारी पहाटे देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेवर काळाने घाला घातला आहे. भल्या पहाटे आपल्या तीन चिमुकल्या लेकींना घेऊन मैत्रिणींसोबत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू (Woman dead in railway accident) झाला आहे. तीन चिमुकल्या लेकींसमोरचं आईनं तळतळत प्राण सोडला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पहाटे साडेपाच वाजता आपल्या तीन चिमुकल्या लेकी आणि मैत्रिणीसोबत नवरात्रोत्सामुळे देवीच्या दर्शनासाठी चालली होती. दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना, दोन रेल्वे एकाच वेळी पास झाल्या. त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. स्वाती रविंद्र शिंदे असं मृत महिलेचं नाव आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या आईच्या आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    खरंतर, मृत महिला ज्या ठिकाणी राहते, तिथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी एकच बोगदा मार्ग आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे परिसरातील सर्व रहिवाशांना असुरक्षित पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. संबंधित बोगद्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी परिसरातील मटण मार्केट पाडण्याची मागणी करणारी याचिका पालिकेनं न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयानं काही दिवसांपूर्वी पालिकेच्या बाजूने हा निकाल दिला आहे.

    असं असूनही पालिकेनं न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळेच हा अपघात घडला असल्याची संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. यानंतर नागरिकांनी नांदगाव पालिकेविरोधात ठिय्या आंदोलन केलं आहे. नागरिकांचा वाढता रोष पाहून पालिकेनं संबंधित पाण्याचा उपसा करण्यासाठी चोवीस तास पंप चालवले जातील. तसेच लोहमार्गालगत रहिवासी भागात पेट्रोलिंग करण्यासाठी सुरक्षा दलाचे दोन जवान तैनात करण्यात येतील. रेल्वे आल्यानंतर हे जवान सायरन वाजवून नागरिकांना सतर्क करतील, असं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे.