Shirdi citizens' statement to the provincial authorities

सध्या या रूग्णालयात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व औषधांचा तुटवडा आहे. सध्याच हे रूग्णालय रूग्ण संख्येला अपूर्ण पडत आहे़ त्यात मंदिर सुरू झाल्यानंतर रूग्ण संख्या आणखी वाढणार आहे या परिस्थितीत कोपरगावचेही रूग्ण शिर्डीत दाखल केले तर तुटपुंजी उभी केलेली व्यवस्थाही कोलमडून पडेल व सर्वच रूग्णांची गैरसोय होईल.

शिर्डी : शिर्डीतील (Shirdi) कोविड रूग्णालयावर (Covid hospital) अवलंबून राहण्यापेक्षा कोपरगावातील (Kopargaon) आजी-माजी लोकप्रतिनीधींनी कोपरगावातच कोविड सेंटर सुरू करावे, ते शक्य नसेल तर शिर्डीतील रूग्णालयाला डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, औषधे, व्हेंटीलेटर्स व ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी शिर्डीतील नागरिकांनी केली.

शिर्डीतील प्रमुख नागरिकांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले़ यावेळी नगराध्यक्षा अर्चना कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, विजय जगताप, संजय शिंदे, दत्तात्रय कोते, सचिन कोते, निलेश कोते, सुजीत गोंदकर, सचिन शिंदे, राहुल गोंदकर, सुधीर शिंदे, अनिल पवार, सुनील बारहाते आदी उपस्थित होते.


साईसंस्थान व आरोग्य विभागाने शिर्डीत नुकतेच कोविड रूग्णालय सुरू केले आहे़ त्याच्या प्राथमिक उभारणीसाठी आमदार राधाकृष्ण विखे यांनी आमदार निधीतून मदत केली आहे. सध्या या रूग्णालयात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व औषधांचा तुटवडा आहे. सध्याच हे रूग्णालय रूग्ण संख्येला अपूर्ण पडत आहे़ त्यात मंदिर सुरू झाल्यानंतर रूग्ण संख्या आणखी वाढणार आहे या परिस्थितीत कोपरगावचेही रूग्ण शिर्डीत दाखल केले तर तुटपुंजी उभी केलेली व्यवस्थाही कोलमडून पडेल व सर्वच रूग्णांची गैरसोय होईल.

कोपरगावात दोन कारखाने, दूध संघासारख्या मोठ्या संस्था आहेत़ तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधी कोविड रूग्णालय उभारण्यास सक्षम आहेत त्यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या धर्तीवर आपल्या तालुक्यात मोठी यंत्रणा उभी करून आपल्या तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा, तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनीही यासाठी आपल्या लोकप्रतिनीधींकडे आग्रह धरावा, असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले.

साईसंस्थान सर्वांचेच आहे याबाबत दुमत नाही मात्र सध्याच्या काळात संस्थानला खूप मर्यादा आहेत. कोपरगावात कोविड रूग्णालय उभारणीस अडचणी असतील तर शिर्डीतील कोवीड रूग्णालयासाठी कोपरगाव तालुक्यातून डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, औषधे, व्हेंटीलेटर्स पुरवावे़ साईसंस्थानकडे विनंती केल्यास संस्थान शिर्डी किंवा निमगाव मध्ये इमारतीची, नाश्त्याची सुविधा देऊ शकेल. तेथे कोपरगावसाठी स्वतंत्र रूग्णालय सुरू करता येईल, असेही शिष्टमंडळाने प्रांताधिकारी शिंदे यांना सांगितले.