नाशिक पोलीस आयुक्तपद सोडून विश्वास नांगरे पाटील मुंबईकडे रवाना, जनतेला दिला भावूक मेसेज

गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरु आहे.

नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पदमुक्त होऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. पदमुक्त होताना नाशिकमधील जनतेसाठी विश्वास नांगरे पाटील (Nashik Police Commissioner, Vishwas Nangre Patil ) यांनी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(gave an emotional message to the people) यामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना ते भावूक झाले आहेत.

काय म्हणाले विश्वास नांगरे पाटील

नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरु आहे. इथे काम करताना इथली माती, इथली माणसं, इथलं पाणी, इथला निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. कोव्हिड संक्रमण काळ असो, निवडणुका किंवा सण-उत्सव, नाशिककर माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. नाशिकची जनताच प्रगल्भ आहे. कायद्याचे पालन करणारी आहे. नाशिककरांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सदैव सुयश चिंतितो. जय हिंद – विश्वास नांगरे पाटील

अशा प्रकारचा ऑडीओ मेसेज विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकच्या जनतेसाठी दिला आहे. ठाकरे सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. त्यामुळे राज्यातील ४० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांगरे पाटील यांना पुन्हा मुंबईत पदभार दिला आहे. त्यांची आता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच नाशिकमध्ये दीपक पांडे यांना पदभार देण्यात आला आहे.