
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्ये नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी सुरु आहे. अशातच पून्हा लॉकडाऊन होणार या भितीने नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी होत आहे.
नाशिक : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्ये नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी सुरु आहे. अशातच पून्हा लॉकडाऊन होणार या भितीने नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी होत आहे.
येथील रेल्वेस्थानकावर गेले पंधरा दिवसांपासून कोरोना चाचण्या बंद आहेत. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा करार संपल्यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी गत आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउनचा अंदाज पाहता नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गर्दी वाढत आहे. चौकशी आणि आरक्षणासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.
मागील १५ दिवसांपासून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कोरोना चाचण्या बंद आहेत. परराज्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तापमान तपासणी व संशयित रुग्णांच्या तपासण्या होत नाहीत. पंधरा दिवसांपासून शहरात आलेल्या लोकांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे नाशिक रोड रेल्वस्थानकाच्या माध्यमातून नाशिक शहरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउन होते की काय, असा प्रश्न परप्रांतीय मजूर कामगार व रहिवाशांना पडल्याने अनेक जण सध्या संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे नाशिक रोड रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या आरक्षण व चौकशीसाठी सध्या तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नाशिक शहरात नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी सुरु आहे. शहर पोलिसांकडून शहरात मध्यरात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री ११ नंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. अत्यावशक सेवा वगळून विनाकारण घरा बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शहराच्या सातपूर, सिडको,पंचवटी,नाशिक रोड, द्वारका भागात नाकाबंदी करत कारवाई केली जात आहे.