‘महाविकास आघाडी सरकारला ५ नव्हे तर २५ वर्षे भीती नाही’, छगन भुजबळांचा दावा

राज्य विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. यामुळे आगामी 3 महिन्यात महाराष्ट्रात भाजपची सत्ता उदयास येण्याचे भाजप नेत्यांचे स्वप्न भंगले आहे. यावरून अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे.

नाशिक (Nashik). राज्य विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. यामुळे आगामी 3 महिन्यात महाराष्ट्रात भाजपची सत्ता उदयास येण्याचे भाजप नेत्यांचे स्वप्न भंगले आहे. यावरून अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपचे नंबर एकचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली. जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपला रामराम ठोकला. पदवीधरमध्ये पुणे, नागपूरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आहे. त्यामुळे आता राजकारणाची हवा बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंघ राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. आता भीती महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या लोकांना आहे. भाजपमधील लोकप्रतिनिधींनी खडसे आणि जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं तर अवघड होईल, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला आता 5 नाही तर 25 वर्षे भीती नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ओबीसींमध्ये दोन गट नाहीत- भुजबळ
ओबीसी समाजात दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर ओबीसी समाजात दोन गट नाहीत, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मोर्चात काही लोकांनी शरद पवार यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला आहे. ओबीसींची वेगळी जनगणना व्हावी, यातही त्याचाच पुढाकार आहे. पवार हे सत्यशोधक समाजाच्या कुटुंबातून मोठे झाले आहेत. त्यामुळे सर्वांना मदत करण्याचीच त्यांची भूमिका असल्याचंही भुजबळ म्हणाले.

‘शेतकरी आंदोलनावर केंद्रानं भूमिका घ्यावी’
गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं भूमिका घ्यायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारनं सकारात्मकतेनं घेणं गरजेचं असल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी आपल्या राज्यात परत गेले तर मोठी जखम देऊन जातील, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलन प्रश्नावर पवार राष्ट्रपतींना भेटणार
माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.