मालेगाव तापले : तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण !

गेल्या वर्षी लॉकडाउन असल्यामुळे सर्वजण घरीच असल्यामुळे उन्हाचा तडाखा बसला नाही. मात्र आता परिस्थिती सुरळीत असल्यामुळे नागरिकांना मार्चमध्येच उन्हाचा तडाखा बसणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे वातानुकूलित यंत्रणांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती.

  मालेगाव : शहर व परिसरात मार्चच्या महिन्याच्या प्रारंभीच उन्हाच्या तीव्र झळा बसण्यास सुरवात झाली असून, दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे मालेगावकर हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या सत्रात रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत असून शितपेयांच्या दुकानात गर्दी वाढली आहे.

  शहरात गेल्या ८ ते १० दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठल्याने उन्हाची दाहकता जाणवू लागली आहे. तापमानाचा वाढलेल्या पाऱ्याने नागरिकांना घाम फुटू लागला आहे. शहरात काल मंगळवारी किमान १८.६ तर कमाल ३८.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरापासून तापमानात वाढ होत असून पारा चाळिशीच्या घरात पोहचला आहे.

  शहरात थंडगार पेयांची दुकाने रस्त्याच्या कडेला
  दिसायला लागली आहेत. काही दिवसांआधी थंडीचा कडाका अचानक वाढला होता. आता उन्हाचा तडाख्याचा अनुभव शहरवासीयांना येत असून, कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही प्रचंड वाढ होताना दिसत आहे. शहरात दुपारी अकरापासूनच नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. रविवारी तापमान ३८.६ अंशांवर पोचले होते. यात सोमवारी वाढ होऊन ३८.८ अंशांवर पोहचले होते. पुढील काळात उष्णतेत आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  गेल्या वर्षी लॉकडाउन असल्यामुळे सर्वजण घरीच असल्यामुळे उन्हाचा तडाखा बसला नाही. मात्र आता परिस्थिती सुरळीत असल्यामुळे नागरिकांना मार्चमध्येच उन्हाचा तडाखा बसणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे वातानुकूलित यंत्रणांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र यंदा मागणी वाढणार असल्याचे दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने सकाळी लवकर घराबाहेर पडून कामे पूर्ण करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून शहरातील अनेक ठिकाणी रसवंती, शीतपेय दुकाने सुरू झाली असल्याने उन्हाच्या तडाख्यापासून सुटका करून घेण्यासाठी नागरिक शितपेयांच्या दुकानात गर्दी करीत आहे. बाजारात मातीच्या माठांना देखील मागणी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात कमाल तापमान ३६ वरून ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढले आहे. त्यामुळे मार्चच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा वाढला असून तापमान चाळिशीच्या घरात येऊन पोहोचले आहे.

  गेल्या आठवडाभरातील तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
  दिनांक किमान कमाल
  ३ मार्च १६.६ ३८.४
  ४ मार्च १६.६ ३८.४
  ५ मार्च १७.८ ३७.६
  ६ मार्च १७.४ ३८.२
  ७ मार्च १७.४ ३८.६
  ८ मार्च १७.६ ३८.८
  ९ मार्च १८.६ ३८.०