अर्धनग्न आंदोलनानंतर रुग्णालयाने पैसे केले परत; जितेंद्र भावे यांच्यासह तरुण पोलिसांच्या ताब्यात…

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी मंगळवारी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर रुग्णालयाने संबंधित रुग्णाचे पैसे रुग्णालयाने परत केले. तथापि, कपडे काढून आंदोलन केल्याबद्दल भावे यांच्यासह अमोल जाधव या युवकास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.

    नाशिक : रुग्ण दाखल करताना भरलेले डिपॉझिटचे पैसे परत मिळण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी मंगळवारी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर रुग्णालयाने संबंधित रुग्णाचे पैसे रुग्णालयाने परत केले. तथापि, कपडे काढून आंदोलन केल्याबद्दल भावे यांच्यासह अमोल जाधव या युवकास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.

    दरम्यान ‘ऑपरेशन हॉस्पिटल’ या मोहिमेंतर्गत आपचे प्रवक्ते भावे हे अवाजवी बिल आकारणार्‍या रुग्णालयांमध्ये जाऊन आंदोलन करीत विरोध करीत आहेत. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक रुग्णांना पैसे परत मिळण्यास मदत झाली आहे. मंगळवारी ग्रामीण भागातील अमोल जाधव हा तरुण व भावे वोक्हार्ट रुग्णालयात गेले. या तरुणाने त्याच्या कोरोनाबाधित नातलगाला वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डिपॉझिट म्हणून रुग्णालयात पैसे जमा केले होते.

    तसेचं रुग्णाचे सर्व बिल भरल्यानंतरही डिपॉझिटचे पैसे परत मिळाले नव्हते. वेगवेगळी कारणे देत असल्याने युवक भावेंसोबत रुग्णालयात गेला. तेथे दोघांनीही अर्धनग्न होत पैशांसाठी ठिय्या दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पैसे दिले. दरम्यान, हे आंदोलन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय बनला. याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन भावे यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर भावे समर्थकांची गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत भावेंविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत वोक्हार्ट रुग्णालय प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.