गुजरात व समुद्राकडे जाणारे पाणी वळविण्याच्या अनुषंगाने नार-पार हा अतिशय महत्वाचा प्रकल्प : छगन भुजबळ

मंत्री भुजबळ म्हणाले की, 'गुजरात व समुद्राकडे जाणारे पाणी आपल्या राज्यात वळविण्याच्या अनुषंगाने नार-पार हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची तहान भागून मराठवाड्याला देखील पाणी वळविणे शक्य होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.'

    नाशिक : आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, गुजरात व समुद्राकडे जाणारे पाणी आपल्या राज्यात वळविण्याच्या अनुषंगाने नार-पार हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची तहान भागून मराठवाड्याला देखील पाणी वळविणे शक्य होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक या नदीजोड प्रकल्पांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात यावा. जेणेकरून हे प्रकल्पांचे काम सुरू करणे शक्य होईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

    बैठकी दरम्यान उपस्थित आमदार यांनी आपल्या मतदार संघातील विविध योजना व प्रकल्पांच्या बाबत येणाऱ्या अडचणी दूर करून सुरू असलेले संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. याबैठकीत जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या सिंचननामा यापुस्तिकेचे प्रकाशन जलसंपदा मंत्री पाटील व पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

    बैठकीच्या सुरूवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ती जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.